Tuesday, July 12, 2011

डोक्याला हात लावुन कधी बसु नये

वडीलधारी माणसं सांगतात ते काही अगदीच खोटे नाही.
 डोक्याला हात लावुन कधी बसु नये.

" गाडी साईडला घ्या "

पाठुन बाईकवर दोन वाहतुक हवालदार. एका सेकंदात मेंदुत स्कॅनींग चालु. नक्की कशाला हे बाजुला गाडी घ्यायला सांगताहेत ? आणि ह्यांना पटवण्यासाठी काय करावे ?

राजाभाऊ  तुम्ही सिग्नल मोडलात ? लेनची शिस्त मोडलीत ?
 नाही .
सिटबेल्ट लावला आहे ना ?
हो.

आता कोणते कलम लावतील हे ?

"गुड इव्हनिंग सर "

राजाभाऊंनी एक जोरात चिमटा घेतला. मुंगीने तर मेरु पर्वत गिळला नाही ना ?
चक्क "गुड इव्हनिंग सर ".

"गुड इव्हनिंग, "गुड इव्हनिंग साहेब "
"साहेब माझे काय चुकले काय ? "
मग तशाच मधाळ स्वरात राजाभाऊंनी विचारले.

दोघांचाही सौजन्य सप्ताह सुरु. डोक्यावर बर्फ आणि तोंडात बर्फी.

"साहेब तुम्ही गाडी चालवतांना मोबाईल वर बोलत होतात. "

" माफ करा हं आपला काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय "

"सर आपण कानाला हात लावुन बसला होतात "

(आता कानाला हात लावणे हा पण गुन्हा ? )

"साहेब कानाला नव्हे डोक्याला. डोके चेपत होतो, काल रात्रीपासुन खुप दुखतयं ’ आणि हा बघा मोबाईल , ब्यागेखाली आहे "

’सर माफ करा हं, आमचं चुकत असेल, ( मध रे मध ) आपला मोबाईल चेक करु शकतो काय ? "

जरुर साहेब जरुर चेक करा ( मधात साखर ). मग दोन चार बटने दाबली गेली.

"हा घ्या तुमचा मोबाईल. तसदीबद्द्ल क्षमा असावी "

"साहेब होतो असा गैरसमज केव्हा केव्हा "

म्हणुन म्हणतो "डोक्याला हात लावुन कधी बसु नये "

खरं सांगायचे म्हणजे वाहतुक पोलीसांच्या अनपेक्षित सौजन्यपुर्ण वागणुकीने धक्काच बसला.
पावसापाण्यात, उन्हातानात , प्रचंड, महाप्रचंड प्रदुषणाच्या विळख्यात हे सारे काम करत असतात.
  

No comments: