Sunday, July 17, 2011

एक घास भटाचा फिश करी राईस मधे

आशिष चांदोरकरांनी लिहावे (पुणॆ टाइम्स, १६ जुलै )  आणि राजाभाऊंने त्याचे ऐकुन हॉटेल बाहेर रांग लावावी. ( या आशिष चांदोरकरांना आवरा आता तरी कोणी ). 

"एक घास भटाचा " 

"फिश करी राईस मधे ".

खरं सांगायचे म्हणजे राजाभाऊंना "मासे" हा शब्द वाचल्यानंतर पुढे काहीही वाचण्याची गरजच नव्हती, जे आपण खात नाही त्याबद्दल वाचावे तरी कशासाठी ?

पण एक तर लेख आशिष चांदोरकरांनी लिहीलेला. त्यात परत त्या लेखात सुधीर भटांचे आलेले नाव व सर्वात मोठी गोष्ट कोणती असेल तर मत्स्याहार प्रिय असणारे त्यांचे वडील पुण्यात रहायला आलेले. ( मुलगा शाकाहारी असल्यानंतर मासांहार करणाऱ्यांची मुस्कटदाबी होत असेल हे त्याचे तेच जाणो. घरी काही हे असले काही भलते सलते खायला आणले जात नाही आणि बाहेर जावुन खाताही येत नाही.) 

मग राजेशभाईंनी आजचे सकाळचे जेवण जेवण्यासाठी "फिश करी राईस " मधे जाण्याचे ठरवले.

आता पर्यंत जेथे मासे मिळतात त्या खाद्यगृहात ते जाणे टाळत आलेले आहेत. कारण एकच. येथे येणारा एक प्रकारचा विशिष्ट वास. आत प्रवेश करतांना दोनचार सेकंद तो जाणवला खरा पण आत बसल्यानंतर मात्र अजिबात तो जाणवला नाही. मग संदेश भट यांच्या ह्या हॉटॆल मधले स्वयपाकघर पाहीले आणि मग आता आपल्याला येथे खाण्यास हरकत नाही असे राजाभाऊंना वाटले. अत्यंत स्वच्छ, निटनेटके, टापटिप. हॉटॆलमधले वातावरणही प्रसन्न वाटले, काय हवे काय नको याची विचारपुस करायला स्वःत संदेश प्रत्येक टेबलाकडॆ जात होते.


आता जेवणाबद्दल काय बोलणे. आशिष चांदोरकरांनी त्या चविष्ट भोजनाबद्दल एवढे भरभरुन लिहिले आहे की त्यानंतर कोणी लिहु नये. 

जेवणाची सुरवात झाली ती कोकम कढींनी. मग समोर आली ती शाकाहारी थाळी (रु.१००) 
मऊसुत तांदळाच्या भाकरीचा पहिला घास. लाल माठाची भाजी (हिच भाजी जर का घरी बनवुन राजेशभाईंना खायला घातली असती तर सात पिढ्यांच्या उल्लेखाशिवाय तिच्या पदरी काहीही पडले नसते ), कोबीची भाजी, डाळींब्या, डाळ भात, हिरवी चटणी, लाल चटणी आणि सोलकढी.

पापलेट फ्राय, बांगडा मसाला व कोलंबी करी , बऱ्यापैकी मोठाल्या कोळंब्या, आख्खे लहानसे पापलेट. तांदळाच्या भाकऱ्या (रु. २५०. ही किंमत जरा जास्त वाटली )  

शेवटी मग आता चांदोरकर म्हणताहेत तर पिऊन बघुया करत रिचवली एक वाटी "जिरामिरा कढी ".   

ता.क. ह्या हॉटेलचा पत्ता म.टा. मधे जरासा चुकला आहे. हे हॉटेल कन्याशाळेच्या शेजारी आहे खरे पण कन्याशाळा कुमठेकर रस्तावर नाही, ती नारायण पेठेत आहे. 

2 comments:

Ap____M said...

kimmat kami ki jaasta te na khaataa tharavana kaahi yogya navhe!

HAREKRISHNAJI said...

मान्य.

येथे शाकाहारी जेवण पण चांगले होते.