आपल्या नवरा किती रोडावलाय, बिच्चाऱ्याला आठवडाभर बाहेर जेवायला लागते, किती हाल होत असतील त्याचे ?
आठवडाभरात मेहनत करुन जे काही वजन कमी केले जाते ते दर शनिवार, रविवारी भरुन काढण्याचा चंग तिने बाळगलेला दिसतोय. परत अपिल करण्याची सोय नाही.
ताटात जे काही पडॆल ते मुकाट्याने गिळायचे, भोजनभाऊंनी. पुढे बोलायचे नाही.
आजचा बेत फार फर्मास होता, भरली वांगी, या चा मसाला किती लाजबाब लागतो, त्यात दाण्याचे कुट टाकलेले असले तर वा ! अमॄतानंदच ! पण येवढ्याने तिचे समाधान होत नाही. जोडीला पिठले, शेवगाच्या शेंगा टाकुन केलेले, चव आणखी चविष्ट करण्यासाठी माफक प्रमाणात टाकलेली आमसुले. नवऱ्याला आणखीन खुळावायचे असल्याने मग यासोबत ज्वारीची गरमागरम भाकरी ( तुप, लोण्याचा गोळा व्यर्जीत ), लसणाची, शेंगदाण्याचे चटण्या. इंद्रायणी तांदळाच्या केलेल्या भातासमोर काहीसे तिखट बटाट्याचे भुजणे.
आई ग ! तुझ्या हातच्या स्वयपाकाची चव विसरलो ग !
या साऱ्यांचा आस्वाद घेतांना काय बिशाद आहे जेवतांना मान वर करुन बघण्याची ?
या आळसावलेल्या देहाला आता प्रवास करायला लावायचे ? कसे व्हायचे ?