Friday, August 31, 2007

आपला गाव तंटामुक्त गाव

"आपला गाव तंटामुक्त गाव" हा एक नवा अभिनव उपक्रम महाराष्ट्र शासन सध्या राबवत आहे. शासनाच्या मला असे निदर्शनास आणुन द्यायचे आहे की याच धर्तीवरचा एक उत्तम उपक्रम गेले १८ वर्षे मी यशस्वीरित्या राबबत आहे. याची सरकारदप्तरी योग्य ती नोंद घेतली जावी.

या लोककल्याणकारी योजनेचे नाव आहे " आपले घर तंटामुक्त घर "

"आपण म्हणाल तसे", "तु म्हणशील तसे" ही या मोहीमेच्या यशाची गुरुकिल्ली. त्यात परत तंटा, भांडण, वाद, आदी यदाकदाचीत उदभवलेच तर ते सामोपचाराने कसे मिटवले जावेत याची पण मार्गदर्शनापर आचारसंहीता तयार आहे. मौनव्रत व असहकार या अमोघ माध्यमातुन ते यशस्वीरीत्या ताबडतोब सोडवले जातात. शरणांगती कमीतकमी किती मिनीटात व जास्तीत जास्त किती तासात मी स्विकारायची हे सुध्हा त्यात नमुद केलेले आहे. सर्व राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय पातळीवरचे निर्णय मी स्वतः घेतो, त्यात कोणीही ढवळाढवळ करत नाही. स्थानीक पातळी वरचे सर्व निर्णय गॄहमंत्री आपल्या अधीकारात घेतात. त्यात त्यांचा शब्द शेवटचा. अपिलला वाव नाही.

या साऱ्यांनो या, घराघरातुन सुरु करुया ही "तंटामुक्त मोहीम", आपले घर, आपला समाज, आपले गाव, आपले शहर, आपला देश, आपले विश्व, अवघे सारे तंटामुक्त करुया.

No comments: