दि.३ ऑगस्टच्या म.टा.मधे एका वाचकाने लिहीलेल्या पत्रात, भटक्या कुत्रांविषयी आपले मत प्रदर्शित केले आहे. यात त्यांनी मुबई महानगरपालिकेचे आयुक्तांच्या "भटक्या कुत्रांना मारलेच पाहिजे " या मताची भलावण केली आहे. खरे म्हणजे एक महत्वाच्या सरकारी अधिकारी व्यक्तीनेच असे विधान करणे हिच मुळात दुर्देवाची गोष्ट आहे. हे वाचक पुढे लिहीतात " एक वेळ अशी येयील की, माणसे कमी व कुत्रांची संख्या जास्त असेल. आणि हा हा म्हणता मुंबई शहर हे कुत्रांचे शहर म्हणुन गिनीज बुकात नोंद होईल."
माणसाने अतिशयोक्ती करावी ती तरी किती? केवळ आपले म्हणणे मांडण्यासाठी? दुसऱ्या प्राण्याला, जीवाला कोणत्याही कारणाशिवाय मारुन टाका हा अनाहुत सल्ला देण्याआधी मानवाने, मानवाचीच संख्या नियंत्रीत ठेवली तरी पुरेसे आहे.
या वसुंधरेवर जगण्याचा मक्ता फक्त आपणच घेतला आहे हा गोड गैरसमज मानवाने करुन घेतला आहे. आपणच या पॄथ्वीलोकावरच्या किती जाती प्रजाती, प्राणी, पक्षी, किटक , एक जीवनचक्र नष्ट करतो आहोत याचे त्यांनी कधी भान ठेवले आहे का ? कधी खाण्यासाठी, कधी शिकारी साठी, कधी आपल्या शौक खातीर, मजे खातीर, छंदाखातीर, खोट्या समजुतीपायी.
केवळ आपल्या स्वार्थासाठीच त्याने जंगलेच्या जंगले नष्ट केली, निसर्गाचा तोल बिघडवला आणि आता पुरातन काळापासुनचा मानवाचा सोबती असलेला कुत्रा त्याला नकोसा झाला आहे ? का ? तर हे भटके कुत्रे म्हणे रस्तावरुन जाणाऱ्या येणाऱ्या माणसांना चावत असतात म्हणुन ? असे किती कुत्रे किती जणाना चावले असतील बरे? आपण हे विसरतो की त्या पेक्षा जास्त, माणसेच इतर माणसांवा चावत असतील, त्रास देत असतील , आपले रोजचेचे जीवन बऱ्याच वेळा दुसऱ्या माणासांनी असह्य करुन ठेवेलेले असते. आणि हो, या पेक्षा जास्त संहार मानवानेच, मानवाचा युद्ध्यात केला आहे, धर्माच्या नावाखाली केलेल्या दंगलीत केला आहे, चोरी, डाका, दरोडेखोरी, लुटमार, करताना केला आहे.
या भटक्या कुत्रांना माया द्यावी,त्यांना लळा लावावा असे आपल्याला कधी वाटतच नाही का? खर बघायला गेले तर ते कुत्रे प्रामाणीकपणे, रात्री बेरात्री आपल्या सोसायटीत, गल्लीत, रस्त्यावर न सांगता कोणत्याही मोबदल्याशिवाय पहारा करत असतात. त्यांची आपल्याला हॊ मोलाची मदत होत असते. बाहेरील माणसांवर त्यांचे बरोबर लक्ष असते.
मधे तर एका गॄहस्थाने चक्क महात्मा गांधीजीची साक्ष काढली होती, गांधीजीचे ही भटक्या कुत्रांना मारले पाहीजे असे मत असल्याचे पत्र लिहीले होते. बहुदा या सदग्रुहस्थांना पिसाळलेला कुत्रा व भटका कुत्रा यातला फरक जाणवला नसेल.
आपण जगा व दुसऱ्याला जगु द्या.
1 comment:
अगदी बरोबर आहे. मानव वंशाचा (स्वतःच्या हस्ते ओढवलेला) विनाश ही एकच आशा आता वसुंधरेला असेल. आपण आहोत तो पर्यंत तिची अशीच विटंबना होत रहाणार.
Post a Comment