Tuesday, June 30, 2009

जा रे जारे बादरवा आणि कारी कारी बादरीया

या आठवड्यात मुंबई मधे मुसळधार बारीश होण्याची दाट शक्यता आहे असे राजाभाऊंच्या सुत्रांकडुन समजण्यात येते.
अचानक पर्जन्य अनुकुल होण्यास, सक्रिय होण्यास का सुरवात झाली याचा शोध घेता व त्याची कारणमीमांसा करतांना असे लक्षात आले की यास काल पासुन कर्नाटक संघात सुरु झालेला " वर्षा उत्सव २००९ " जबाबदार आहे.
उद्या पासुन नेहरु सेंटर मधे सुरु होणारा "मेघ मल्हार " त्यात भर घालण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यात भरीस भर म्हणुन रविवारी पं. पंढरीनाथ कोल्हापुरे व त्यांचा शिष्य वर्ग क़ुमारजींचा " गीत वर्षा " हा कार्यक्रम सादर करणार आहेत.

काल शौनक अभिषेकींनी धमाल केली. गौड मल्हार, कुक्कुभ मल्हार, वृंदावनी की मल्हार, सावन (मीरा भजन ) गावुन तापलेल्या रसीकांच्या मनास तृप्त केले. त्यांनी गायलेला रागमाला हा प्रकार पहिल्यांदाच ऐकला. बंदीश एक पण अनेक रागांमधे गुंफलेली, मधेच एकेका ओळीर चक्क दोन दोन राग. असे कधी ऐकणे झाले नव्हते.

त्यांच्या आधी श्री. योगेश हुन्सवाडकर यांनी मीयां का मल्हार व नानक की मल्हार ऐकवुन योग्य ती वातावरण निर्मीती केली होती.
आता वेध लागले आहेत मंजुषा कुलकर्णी पाटील यांना ऐकण्याचे

Monday, June 29, 2009

९० : १०


महाराष्ट्र टाईम्स आणि टाइम्स ऑफ इंडिया , दोन्ही एकाच गृपची वर्तमानपत्रे।


.टा. महाविद्यालयीन प्रवेशाच्या बाबतीत च्या S.S.C विद्यार्थांची बाजु घेतो तर टाइम्स ऑफ इंडिया ICSE , CBSE च्या विद्यार्थांची.

हे गौडबंगाल काय आहे ?

Saturday, June 27, 2009

जयपुर अत्रोली घरण्याची गायकी.

आतापर्यंत आयुष्यात बऱ्यापैकी गाणे ऐकले, नुसतेच ऐकले, कोरडेपणाने, जाणुन न घेता, जाणण्याचा प्रयत्न न करता, न कळता, न वळता, गाणे म्हणजे काय ते समजुन न घेता.
आज N.C.P.A Mumbai ने एका अप्रतिम कार्यशाळेचे, चर्चासत्राचे आयोजन केले होतो.
जयपुर अत्रोली घरण्याची गायकी.
श्रुती सडोलीकर, पं दिनकर पणशीकर, पं.अरविंद पारिख व पं. सत्यशील देशपांडे यांनी त्यात भाग घेतला.

घराणे म्हणजे काय व या घराण्याच्या गायकीमधील रस, रसभाव, आकार, एकार, रागांची निवड, जोडराग, तालाची निवड, बंदीशीची निवड, रागाची बढत, ताना, तानांची पद्धत आदींवर या कार्यशाळेत श्रुती सडोलीकरांनी फार माहितीपुर्णक सादरीकरण केले.
चर्चा व प्रात्याक्षिके, आणि त्यात पं।सत्यशील देशपांडे यांनी आपल्या संग्रहातुन आणलेली केसरबाई केरकर, मोगुबाई कुर्डीकर, निवृत्तीबुवा सरनाईक, वामनराव सडोलीकर आदींनी गायलेली गाणी , चार साडे चार तास कसे निघुन गेले कळलेच नाही.

चला करोडोच्या दौलतीमधला एखादा पै हाती लागला.

आणि आषाढाच्या तिसऱ्या रात्री

कहु किससे मै क्या है शबे-गम बुरी बला है
मुझे क्या बुरा था मरना अगर एक बार होता

Friday, June 26, 2009

आषाढाच्या प्रथमदिवसे आणि भगत ताराचंद

आषाढाच्या प्रथमदिवसे ज्यांची प्रिया त्यांच्या बरोबर असते त्यांच्या खिशाची चांगलीच वाट लागते.
"तुला कसे कळले माझ्या मनात काय आहे ? "
"किती तरी दिवस झाले .... "
"कळले. आज संध्याकाळी आपण तुला मंगलदास मार्केट मधे जावुन एखाद्या ड्रेससाठी कपडा घेऊ, मग पर्स, आणि मग किती तरी दिवस विनयमधे पातळभाजी पाव खायला जायचे म्हणत होतीस ते ही करु "
"मी आज घरी जेवायला आम्ही नाहीत म्हणुन सांगितले आहे "
"माहिती आहे मला, आपण आता भगत ताराचंद मधे (मुंबादेवी) जेवायला जाणार आहोत."
तुला कसे कळॅले माझ्या मनात काय आहे ते? "
भगत तारांचंद मधली डाळ फ्राय तिची अत्यंत आवडती, त्यात तळुन घातलेला तो कांदा. ती शेव टौमेटोची भाजी, ती खस्ता रोटी, बटर मारके. मारवडीपद्धतीचे देशी जेवण येथे खुप चविष्ट मिळते.
(पुण्याला जातांना तळेगावच्या टोलनाक्या कडे त्यांची शाखा आहे. मुंबई वरुन आमच्या कडे पुण्याला गाडी घेवुन येतांना राजाभाऊंच्या मेहुणीच्या पोटात गोळा येतो. बहिणीचा फरमाईश असते, भगत ताराचंद कडे थांबायचे व डाळ फ्राय पार्सल आणायची )
पण त्यात तिचा एकच वांदा झाला, नेमके राजाभाऊंच्या हाती " मेघदुत " होते, चालतांना वाचत चालायचे, खरेदी करतंना वाचत खरेदी करायची आणि वाचत वाचत जेवायचे.

नशीब, भडका उडला नाही.

नाहीतर आषाढस्य प्रथमदिवसे ,झगडा आणि अबोला. यक्षाची एक लहानशी झलक मिळता मिळता राजाभाऊ बचावले

आषाढाच्या दुसऱ्या दिवसे आणि मोती महाल

वांद्राला टर्नर रोड वर असलेले मोती महाल कधीतरी नजरेत भरले होते, केव्हातरी येथे जेवायला जायचे मनात धरले होते , पण जाणे काही होत नव्हते. मग अचानक योग जुळुन आला. रात्रीच्याला तेथे जेवायला जायचा. राजाभाऊंचे काका त्यांना घेवुन मोतीमहाल मधे जेवायला गेले.


सुरवातीला आम्ही क्रिस्पी भेंडी मागवली, पाताळ्शी भेंडी कापुन ती कुरकुरीत तळलेली. व्हे. कबाब नक्की कोणते मागवायचे या बाबतीत राजाभाऊंच्य मुलाचा चांगलाच गोंधळ माजला, त्या वर तोडगा म्हणुन त्याने मग सर्व मिक्स कबाब मागवले, ते ही चवीला चांगले होते. त्यातली ती लहानुशी तंदुरी, धुरकटलेली बटाटी, अहा, लाजबाब, ती त्यांनी आणखीन द्यायला हवी होती, भरमसाठ पनीरच्या ऐवजी


पण भाज्यांनी मात्र अंमळ निराशा केली. काश्मिरी दम आलु, लहानसे आलु, त्यात मस्तपैकी काहीतरी गोडुस भरलेले , पण एकंदरीत ही भाजी आणि त्या बरोबर मुलानी मागवलेली बहुदा पनीर मसाला चांगल्या पैकी सुकी होती, त्या मुळे खाणे जड जात होते, डाळ मागवायला पाहिजे होती.

मग पुढे आणखीन काही मागवायचा कंटाळा आला.

मग राजाभाऊंच्या बायकोला अचानक सांताकृझ मधल्या "गोकुळ" मधे मिळणारे श्रीखंड आठवले. मग काय ते आणायला वाटेत रस्तात थांबणे.

त्यांने सांगितले आहे कीं,


त्यांने सांगितले आहे कीं,
"सद्ध्या मी शोधतो आहे -


प्रियांगु वेलीत तुझी देहलता,
बावरलेल्या हरिणीच्या नयनात तुझी बावरी नजर,
पुनेवेच्या पुर्ण चंद्रात तुझे सुंदर मुख,
मयुराच्या फुललेल्या पिसाऱ्यात तुझा काळाभोर केशकलाप,
आणि नदीच्या जलाच्या हलक्याशा लहरीत तुझे तरल भ्रुविलास.

प्रेमातिशयाने कृतककोपानें
रागवलेल्या
अशा तुझे चित्र
इथल्या मातीच्या रंगाने काढुन
त्यांत
तुझ्या चरणासमीप पडलेल्या
अशा माझें चित्र मी काढु पहातो
तेवढ्यात सतत वहाण्याऱ्या माझ्या अश्ऱुंनी
माझीच द्र्ष्टी धुसर होते !
चित्र अधुरे रहाते !

हाय !
कृर निर्दयी काळाला
त्या चित्रात सुद्द्या
आपले मिलन सहन होउ नये ना ?

सुप्रसिद्ध लेखक, अनुवादक श्री. ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी अनुवाद केलेल्या कालीदासाच्या मेघदुत मधुन साभार। कश्चितकांता - मराठी मेघदुत ।

हे मेघा

निसर्गाप्रमाणेंच मानवाच्या चित्तवृत्तीसुद्धा आनंदाने बहरतील. अत्यानंदाने धुंद झालेले सिद्धसुद्धा या निसर्गात रमतील. पावसाचें जलकण वरचेवरच झेलत मोठ्या चातुर्याने ग्रहण करणारे चातक त्यांचे लक्ष वेधुन घेतील ! गगनातुन मोठ्या डौलाने विहरत जाणाऱ्या बलाकमला तर त्यांची नजरबंदीच करतील !


सिद्ध या उडत्या बगळ्यांची संख्या मोजण्यात मग्न होतील, आणि अश्या बेसावध क्षणी तु अचानक आपल्या गर्जनेचा मोठ्ठा आवाज केलास तर त्यांच्या प्रियसख्या दचकतील, भयभीत होतील, आणि काहींश्या संभ्रमित अवस्थेतच आपल्या सिद्धांना अलिंगन देतील !


आणि केवळ तुझ्यामुळेंच ही सुखाची ठेव अचानक मिळाल्यानें सिद्ध मात्र तुझ्यावर मनापासुन खुष होतील।

सुप्रसिद्ध लेखक, अनुवादक श्री. ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी अनुवाद केलेल्या कालीदासाच्या मेघदुत मधुन साभार। कश्चितकांता - मराठी मेघदुत ।

हे मेघा

वैशाख वणव्याने सारा आसमंत भाजुन निघत असतो. सुर्याचा ताप साऱ्या प्राणिमात्रांना असह्य होत असतो।

वसुंधरा तळपत्या उन्हानें होरपळॅत असते। नद्या, नाले आटलेले असतात. पाण्याच्या एका थेंबासाठीं सारी सृष्टी आसुसलेली असते. तुझ्या वाटेकडे सारे प्राणीमात्र डोळे लावुन बसलेले असतात.


अशा वेळी तुझे आगमन झाले आणि तुझ्या सहस्त्रधारांचा वर्षाव सुरु झाला म्हणजे हा सारा ताप जादुच्या कांडीप्रमाणे क्षणात नाहीसा होतो आणि हवेत सुखद गारवा येतो !


दुर देशाटनाला गेलेले प्रणयी पुरुषसुद्धा विरहाग्नीने पोळॅत असतात ! तुझी चाहुल त्यांना मिलनाचा संकेत देते। रमणीच्या प्रेमाच्या वर्षावामुळें त्यांच्या विरहाग्नीसुद्धां शांत होणार आहे, हे तुच त्यांना कळव.


सुप्रसिद्ध लेखक, अनुवादक श्री. ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी अनुवाद केलेल्या कालीदासाच्या मेघदुत मधुन साभार। कश्चितकांता - मराठी मेघदुत ।

Thursday, June 25, 2009

९० : १०

११ : १२ - अकरा महिने संबधीतांनी झो़पा काढल्या आणि आता निकाल जवळ आला तसे जागे झाले ।

गतवर्षीच्या "पर्सेंटाइल " फार्मुल्याचा फियास्को झाला , तेव्हा त्या ऐवजी दुसरया कोणत्याही फार्मुल्याचा वर्षभर विचार केला गेला नाही ।

आता यंदालाही ही घोळात घोळ।

Sunday, June 21, 2009

ऋतुराज


जलकणांनी भरलेले कृष्णमेघ

हे मिरवणुकीच्या अग्रभागीचे

मदमस्त गजराज आहेत,

विद्युत लतांच्या

पताका फडकत आहेत,

मेघगर्जनांचे नगारे वाजत आहेत,

चहुकडे तेज पसरत आहे,

असा कामीजनांचा आवडता

वर्षा

हे प्रिये

येत आहे

एकाद्या राजासारखा !

श्री. ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी अनुवादीत केलेले कालीदासाचे "ऋतुराज" मधुन साभार

आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं


आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं
वप्रक्रिडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श
तिळातिळा दार उघड किंवा खुल जा सिमसिम या परवलीच्या शब्दांचा अर्थ काल अचानक उलगडला.
वाचनालयात जी.ए.ची पुस्तके घेतली. बाहेर बसलेल्या एका गृहस्थांनी ते शब्द उच्चारले कानी आले " आषाढस्य प्रथमदिवसे " ।
वाचनालय चालवणारे व सुप्रसिद्ध लेखक, अनुवादक श्री. ज्ञानेश्वर कुलकर्णी यांच्याशी ते बातचीत करत होते।

मग काय. जी.ए. राहिले बाजुला. हा महिना कालीदासाचा . या वेळी जो मेघदुत वाचायला घेणार नाही तो ..
हाती लागले ते श्री.कुलकर्णी यांनी अनुवादीत केलेले " हे मेघा " हे पुस्तक व त्याच बरोबर त्यांनी लिहिलेली कालिदासा वरील "कविराज " ही कादंबरी।

मग या विषयावार बोलताबोलता श्री. कुलकर्णी यांनी एक मोठे समृद्ध भांडार खुले केले , जणु खजिना माझ्या समोर रिता केला. महाकवी कालिदासानी लिहिलेली व श्री. कुलकर्णी यांनी अनुवाद केलेली आणखी तीन पुस्तके मला वाचायला दिली।

कश्चितकांता - मराठी मेघदुत

आकाशगंगा - मराठी कुमारसंभव

ऋतुराज - मराठी ऋतुसंहार

Saturday, June 20, 2009

इंदुचे स्वयपाकघर अर्थात Indus Kitchen





Traveller's Tales: Pune Dining: New Updates

खाण्याच्या बाबतीत राजाभाऊंचे आदर्श म्हणजे श्री. शंतनु घोष. त्यांनी सांगावे आणि त्यांच्या चाहत्यांने ते ऐकावे व तेथे जेवायला जावे.

गेल्या शनिवारी "देशी शेफ " मधे जावुन अर्धवट जेवलेले राजाभाऊ आणि त्यांची बायको "इंडस किचन" च्या दारात जावुन परतले होते . तिला बुफे जेवणा ऐवढी भुक नसल्यामुळे. राजाभाऊ निराश जरी झाले असले तरी त्यांनी हार मानली नव्हती. मग ठरले. आजचा बेत "इंडस किचन" मधे बुफेला जायचे.
मस्त पावसाळी माहोल. चांगल्यापैकी जेवण. सोबत ती.
और क्या चाहिये जीने के लिये.

लट उलझी सुलझा जा रे बालम आणि तात्या. तात्या अभ्यंकर

केव्हा केव्हा एखादे गाणे ऐकल्यानंतर ते आपल्याला ऐवढे झपाटुन टाकते, ते नुसते डोक्यात गरगरा, गरगरा फिरत रहाते, वाटते आपणही असे मुक्तहस्ते ते दिलखुलास , मनसोक्त गावे , अगदी जी भरके , पुरेपुर ते उपभोगावे, निदान बऱ्यापैकी ते गुणगुणावे, पण आपला भसाडा, अर्थहीन , कापरा आवाज आपली उपज, क्षमता लक्षात घेता ते कठीणच असते.

आज तात्या अभ्यंकर भेटले. आतापर्यंत ते त्यांच्या ब्लॉग वर तसे अधुन मधुन भेटत होते. खऱ्या अर्थाने भेटले असे काही अजुन म्हणता येणार नाही. पण भेटले. यु ट्युब वर त्यांनी सादर केलाला बिहाग रागावरचा कार्यक्रम पाहिला आणि. आता पर्यंत त्यांच्या ब्लॉग च्या प्रेमात पडलेले राजाभाऊ आता तात्यांच्या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडले आहेत.

तात्या आप महान हो. तुसी ग्रेट हो. ( ही वाक्य आठवली कि त्या बरोबर अप्पुराजा चित्रपटातील तो पोलीस इंन्स्पेक्टर आणि त्याचे ते चमचे हवालदार, त्यांच्या चेहऱ्या वरचे ते ओथंबलेले भाव हमखास आठवतात )
बहार आली.
आता कधी एकदा तात्यांच्या कार्यक्रम प्रत्यक्षात ऐकतो किंवा त्यांना भेटतो असे झाले आहे.


Monday, June 15, 2009

जी.ए. आणि श्री. कान्हेरे यांचे "देशी शेफ"

जी.ए. आर्थिकदृष्टा फार महागात पडायला लागले आहेत.

राजाभाऊ " निळासावळा " वाचण्यात मग्न. हीच वेळ आहे ते तिने बरोबर हेरलेले.

"तुला माहितेय तो टि.व्ही. वर त्या कार्यक्रमात असतोना तो शेफ, तो रे. काय त्याचे नाव . .. त्याने ना , हे बघ सकाळ मधे त्याबद्दल लिहुन आलयं , त्याने ना एक मस्त उपहारगृह सुरु केलय, पौड रोड वर, किती दिवस मी तुझ्या मागे लागले होते ना सिझलर्स खायला जायचे आहे म्हणुन , हे बघ फक्त ९० रुपयात "

तर अश्या रितीने तिने त्याला सिझलर्स खायला "देशी शेफ " मधे नेले.

शेफ कान्हेरे यांनी एक चांगले, विविध देशांचे खाद्य पदार्थ देणारे पुण्यात उपहारगृह सुरु केलयं.
पण किंमत कमी ठेवल्याने मग पदार्थाचे प्रमाण कमी ठेवणे आले. एका डिश मधे पोट काही भरले नाही. आणि दुसरे काही खायला मग कंटाळा आला.
He has done a good job, but he can do much better.

रिलायन्स आणि जी.ए.

मुंगीने तर मेरु पर्वत गिळला नाही ना ।

रिलायन्स स्टोर मधे चक्क मराठी पुस्तके विकायला आणि त्यात परत जी.ए. ची देखिल. शरीराची आणि मनाची भुक एकाच ठिकाणी भागवणे ?
हो घे ना, हो, हो, अगं तुला काय हवे ते खरेदी कर, प्रत्येक गोष्ट मला विचारायला हवंच का ? चालेलना, घे। राजाभाऊंची तंद्री लागली होती "विदुषक " वाचण्यात. काजळमाया मधली जी.ए.ची भन्नाट कथा, आवडती कथा. उभ्या उभ्या वाचुन फडाशा पाडायचा म्हणजे अधे मधे काहीही व्यत्यय नसावा, तेव्हा बायकोला आज मुक्तहस्ते, मुक्तद्वार.

आताशा परत जी.ए.झपाटुन टाकायला लागले आहेत. आता काय तर "निळासावळा" सापडलाय.
जी.ए. वाचायला फार वेळ लागतो, झरझर, झरझरा वाचुन फडाशा पाडता येत नाही, आधी एकेक शब्द वाचायचा, मग वाक्य मग परीच्छेद।

Friday, June 05, 2009

मी विचार करत होतो , आपण आहात कुठे ? आयुष्य खुप कठिन होत चालले आहे , वेळ मिळणे अवघड झाले आहे आणि त्यात परत मुलगा computer घेवुन पुण्याला गेला आहे


कुमार गंधर्व रचित चैती भूप रागातील ही रचना आहे , चैत्रात नीमाला खुप सुरेख पालवी फुटते, तो निमोण्यानी (?) बहरून येतोत्याला वर्णन केले आहे यासारखे माझेही मन बहरू देत असा विचार मांडला आहेशब्दशा अर्थ मला आत्ता आठवत नाहीय

सध्या मी अविनाश बिनीवाले यांचे "पूर्वांचल " वाचायला घेतले आहेनिशानी डावा अंगठा कोणाचे आहे ?

अधुन मधुन ब्लॉगला भेट देत रहावी

Thursday, June 04, 2009

वेटिंग फॉर गोदो

"आता पर्यंत काही मागीतले आहे काय मी तुझ्याकड़े , सांग मला । एक साधी इच्छा ती पण पुर्ण होत नाही ।"
राजाभाऊंच्या मुलाचे त्यांच्या कड़े बघून , आपल्या आईची नजर चुकवुन एक छद्मी हास्य. आनंदाच्या उकाळ्या नक्कीच फुटत असणार , आपल्या बापाला आता कितीचा खड्डा पडणार आहे याचा विचार करत।
तारुण्यात आणि त्या मस्तीत तिला " हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकलेबहुत निकले मेरे अरमाँ, लेकिन फिर भी कम निकले " ऐकवले होते । आता ते तारुण्य नाही राहिली आणि ती मस्ती देखील
"आपण बरेच दिवस झाले नाटकाला गेलेलो नाही , तु मला कधीच नाटक बघायला घेवुन जात नाही । "
नक्कीच तिच्या मनात साहित्य संघात "तुम्ही म्हणाल तसे " पहायला जायचे असणार.
राजाभाऊं, राजाभाऊं, हाच मौका आहे, हिच वेळ आहे तिला धडा शिकावायची , परत नाटकाला जायचे नाव काढायची नाही ।
आणि राजाभाऊं तिला "वेटिंग फॉर गोदो " पहायला घेवुन गेले।
"फारच जड़ आणि अवघड नाटक होते ग, काही कळालेच नाही बघ , मला काय माहीत हे नाटक असे असेल म्हणुन , मला वाटलं, एवढे जगप्रसिद्ध नाटक आणि टॉम आल्टर मराठीतुन काम करत आहे तर ........ "
मानभावी , मानभावी पणा म्हणतात तो हाच काय ?
पण
" रात्री जेवायला घरी काहीही केलेले नाही , आज आपण "वे साइड इन " मधे जेवायला जाणार आहोत। "
तेव्हा।
या बायका आपल्या पेक्षा दोन पावले पुढे असतात हेच खरे ।

Monday, June 01, 2009

UPA - UnPredicted Achivement

हे राजकीय पक्ष निवड्णुकीच्या आधीच जर का आपल्याला सत्ता मिळाली तर मंत्रीमंडळात कोणाला किती वाटा दिला जावा याचा फॉर्मुला आधीच का बरे ठरवत नाहेत ?