जीव कासावीस होवु लागला, शरीरात उठलेला आंतरीक दाह अधिकाधीक भडकुन उठु लागला. तप्त शरीर आणि तडफडणारे मन, धाव घेवु लागले, ओढ लागली , सह्याद्रीची, निसर्गाची, पावसाचे रुप पाहाण्याची, मनमुराद भटकण्याची.
चित्रपटात आपण अनेकदा एक प्रसंग पाहातो, बंद दरवाजा उघडुन पलिकडे जातो, आणि अचानक एकदम दृष्य पालटते, समोर येत ते काही निराळेच असते. अगदी तस्सेच. गाडी कसाऱा घाटात डावीकडे कसारा- जव्हार रस्तावर वळली , आणि अचानक निसर्गाच्या कुशीत प्रवेश झाला. एक अप्रतीम परिसर. निसर्गाने काहीही हातचे न राखता सारे काही उधळुन दिलेले, नुसती नयनरम्य लयलुट.
केवढे निसर्गाचे वैभव येथे पहायला मिळते.
या नदीवर धरण होवु घातलय. वेंतरणा पुलाकडचा सारा परिसर दोन तीन वर्षात पाण्याखाली नाहिसा होणार आहे
स्वागताला आला तो विहीगावचा एक भलामोठाला धबधबा. पण यात फारसे गंतुन पडायचे नव्हते. या धबधब्यापाशी दोन-चार गृप आले होते. आमचे खरे लक्ष लागले होते ते पुढे असलेल्या वेंतरणा पुलाजवळील महाभयानक अविष्काराकडे, पाण्याच्या रौद्रस्वरुपाकडे, महाभयंकर वेगात खाली बेभान होवुन झेप घेणऱ्या पाण्याच्या प्रवाहाकडे, आपल्या वेगाने बलदंड खडक कोरुन त्या भयानक घळीतुन उद्दामपणे आपल्या मस्तीत धावणाऱ्या , कल्लोळ करणाऱ्या प्रपाताकडे.
पाय काही निघवत नव्हता.पण हा सारा परिसर येवढा निसर्गाने भारावला आहे हे ध्यानी घेता रस्तावरुन पुढे चालत निघालो. जेथे दृष्टी जाईल तेथे केवळ हिरवा शालु, त्यावर तांबडी जरीबुट्टी, सोबत सतत लागणारी वेंतरणा, ओढेनाले, धबधबे कधी खोडाळ्याला पोचलो कळालेच नाही.
आता वेध लागले होते ते देवबांध चे. वेंतरणा नदिच्या किनारी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे लोकोपोयोगी अनेक उपक्रम चालवले जातात, एक गणपती मंदिर आहे, आणि मुख्य म्हणजे हा चार कि.मी. चा रस्ता , अप्रतीम. जातांना बस मिळाल्यामुळे बसनी गेलो पण येतांना मात्र डोंगरातुन पायवाटांनी चढत आलो, तेवढे थ्रिल.
या वाटेत मधेमधे जबरदस्त मोठाले धबधबे आहेत, पहात पहात, चवीचवीने आनंद लुटत परत खोडाळ्याला , हा रस्ता पुढे जव्हारला जातो, या रस्तानी परत कधीतरी प्रवास करायला हवा ही खुणगाठ मनाशी बाळगत परतलो.
आता जायचे होते ते सुर्यमाळला. खोडाळा-वाडा रस्तावरचे हे आणखीन एक वेडापिसा करुन सोडणारे ठिकाण. स्वागताला ढग खाली उतरले होते, आता आम्ही उंचीपण बऱ्यापैकी गाठलेली, पठार, हिरवीगार कुरणे, शितल पवन, आल्हाददायक वातावरण, काश ती पण सोबत असती.
अप्रतीम परिसर. परत परत जावुन पहाणासारखा.
पुढे वाड्याला जाण्यासाठी काय वहान मिळेल का नाही याची शाश्वती नव्हती, बऱ्याच वेळाच्या प्रतिक्षेनंतर परत माघारी खोडाळ्याला फिरणाच्या दुख:द निर्णय घेतला , अपुर्णतेच गोडी असते अशी मनाची खोटी समजुत घालत.
2 comments:
छान लिहिलंत. देवबांध अप्रतिमच आहे!
ते नवं धरण, मध्य वैतरणा प्रकल्प का?
Thanks.
Yes. Middle Vaitarna.
Post a Comment