Saturday, February 23, 2008

मराठी माणुस, मराठी भोजन, व मराठी शहर

या मराठी माणसाचा या मध्यल्या काळात स्वाभिमान जागा झाला, खाईन तर मराठी भोजन नाहीतर राहीन भुकेला. त्यात परत ते गेले होते मराठीमोळ्या शहरात, ठाणे शहरात, त्यात भर पडली होती मराठी सणाची, आज माघी गणेश जन्म. मनात स्वार्थ जागा झाला. उकडीचे मोदक, मस्त पैकी चौरस थाळी, अहाहा नामी बेत. खासा बेत, शाही बेत.
पण मनुष्याच्या मनात एक असते व नियतीच्या दुसरे.
वेळ तशी अवेळ . सकाळचे अकरा. हरकत नाही. आधी पोटोबा मग गणॆश दर्शन. मराठी माणुस चालवत आलेली ऑटो रिक्शा पकडली . म्हटले बाबारे , आमचे पोट तुझ्या हवाली , पटकन छान पैकी चविष्ट, रुचकर अशी थाळी मिळेल अश्या मराठीमोळ्या उपहारगृहात घेवुन चल रे आम्हाला.
पण ! आपल्या वतनाला नाही हो तो जागला . घेवुन गेला आम्हा उभयतांना उडप्याच्याच उपहारगॄहात. केवढे तयाचे हे घोर अज्ञान , की साऱ्या ठाण्यात मराठी उपहारगॄह नाही ? असा कसा रे हा प्रसंग आम्हावर ओढवला ? कोणास जागावे ? मराठी बाणा ठेवावा की उदरभरण करावे? शेवटी नेहमी प्रमाणे तडजोड केली. येथ पर्यंत आलोच आहोत तर सध्या फक्त दाक्षिण्यात पदार्थाची न्याहारी करावी, पुढचे पुढे.
दुपारी तिन वाजताच्या सुमारास ठाण्यात परतलो, बसचालक शेजारीच बसले होते तयांशी पुच्छा केली, मास्तर, सांगा आम्ही कोठे जेवु. तुमची बस साऱ्या ठाण्याभर फिरत असते, सारे रस्ते आपण पालथे घालत असता, मराठी शुद्ध शाकाहरी भोजन कुठे मिळेल तेवढे गाठुन द्या.
तयांनी मार्गी लावुन दिले. एका उपहारगृहाची गाठ घालुन दिले, हाय रामा, मास्तर तुम्ही सुद्धा ? साऱ्या दुनीयेभर केवळ ऊडपीच आहेत काय ? पंजाबी जेवायच ? चायनीच जेवायच ? मेक्सीकन जेवायच ? अमेरीकन हवे ? चला ऊडाप्या कडे.
मराठी माणुस. तत्व म्हणाजे तत्व, आपण तसे बऱ्याबोलाने हार मानणारे, पराभव स्विकारणारे नसतो, जाज्वंत स्वाभीमान. शब्दाला पक्के. मराठी भोजन एकदा ठरले म्हणजे ठरले आता त्यात तडजोड नाही. रस्तातही दोनचार दुकानात विचारुन झाले. पण नकारघंटाच नशीबी.
पण मग नायलाजास्तव शेवटी एक भय्या रिक्शावाला पकडला. भेय्याजी, थाली (एक पायरी खाली ) खाना है कही अच्छा हॉटॆल मे ले चलिये.
शेवट - टिपटॉप मधे गुजराती थाळी, माणासी रुपये १७०.०० मोजुन जेवलो. त्या थाळीत गुजराथी पदार्थ होते, पंजाबी , आणि अगदी चायनीच सुध्दा होते. पण मराठी पदार्थ जरा सुद्धा नव्हते.
मग मात्र रात्री खास वाट वाकडी करुन ठाकुरद्वारी विनय मधे चटकदार उसळ, मिसळ हाणायला गेलो.
तत्व म्हणजे तत्व. खाणार म्हणजे खाणार.

No comments: