Wednesday, September 19, 2007

प्रिय बाप्पा,


प्रिय बाप्पा,
क्षमा करा, आपल्याला नमस्कार करायला माझे हात मोकळे नाहीत, दोन्ही हाताची बोटे दोन कानात घालुन मी बसलो आहे

देवा, आपल्या भक्तांना आता तरी आवरा जरा.
रात्रीचे जवळ जवळ १२ वाजुन ०५ मिनिटे झालेली आहेत. तुमच्या विसर्जनासाठी, दिवसभर झोपलेले काही मुठभर कार्यकर्ते रात्री १० वाजता जागे झालेले आहेत. रात्री १० वाजता फटाके, ताशे, बॅडबाज्याच्या सुमुधुर ध्वनीच्या साथीने सुरवात झालेले त्यांचे आपल्या पुढिल नयनरम्य नॄत्य पाहाण्यासाठी आपणास एकाच जागी दिड-दोन तास ताटकळात उभे रहावे लागले आहे. त्यास इलाज नाही. आज रात्रभर आपणास व आपल्या बरोबर आपल्या सर्व भक्तांना सक्तीचे जागरण आहे.
त्यात परत, उद्याला मी कार्यालयात या जागरणापोटी कसे काम करणार, मुलाला सकाळी लवकर महाविद्यालयात जायचे आहे . त्याची झोप पुरी व्हायलच हवी आहे, माझ्या वयस्कर आई वडीलांना हे जागरण, आवाज सहन होत नाही, या साऱ्या चिंतेचा पण भार आपल्यालाच उचलावा लागला आहे.
कायदा, पोलीस वगैरे तुमच्या, आमच्या मदतीला येतील ही भ्रामक कल्पना कृपया करुन उराशी बाळगु नका.
देवा, पुढल्या वर्षी ज्ररा लवकरच या म्हणजे सकाळी लवकर, आधल्या रात्री १२ वाजता नव्हे व संध्याकाळी लवकर जाणॆ जमेल असे बघा.

आणि हो, हे सारे लोकमान्य टिळकांना अपेक्षीत असावे का ? असा सवाल कृपा करुन मला विचारु नका. हाच सवाल मीच तुम्हाला विचारु इच्छीतो.

1 comment:

Yogesh said...

१००% सहमत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव आता पुरे असे म्हणण्याची वेळ या कार्यकर्त्यांनी आणली आहे.