हल्ली वेताळ तसा धास्तावला दिसत होता, मधेच स्वताःशीच "मी मांसाहारी नाही हो, खरच मी मांसाहारी नाही, मी फक्त वरणभातावर साजुक तुप घालुन खाणारा माणुस होतो हो, हवे तर आता तुप पण खाणे बंद करतो, मनेका गांधी म्हणाली होती ना गाईचे दुध पण मांसाहारी आहे , तिचे मी ऐकतो, पण नका हो नका मला" असे अर्थाचे काहीतरी पुटपुटत अचानक वेताळ गप्प झाला.
नेहमी माझ्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर दे नाहीतर परीणाम तुला ठावुक आहे म्हणणारा वेताळ, आज आपल्याच विचारात मग्न झालेला होता. काहीच न बोलता मधेच सुस्कारा सोडीत या खांद्यावरुन त्या खांद्यावर फिरणाऱ्या वेताळाचे हाल विक्रमाला आज पहावले नाही, स्वताःहुन त्याने आज बोलायचे ठरवले.
बा वेताळा, काय झाले सांगशील की नाही , तुझे दुःख दुर करणे माझ्या हातात असलेतर मी ते जरुर करीन, विक्रमाने विचारले.
पण वेताळ काहीच बोलला नाही , दर्दभऱ्या नजरेने आपल्या वडाच्या झाडाकडे, आपण लटकत असलेल्या फांदीकडे केवीलवाण्या नजरेने एकटक पहात राहीला, शेवटी ही झाडे विक्रमाने, त्याच्या पुर्वजांनी लावलेली आहेत ते तो कसे विसरु शकत होता ?
विक्रमा, चल तुला मी प्रश्न विचारतोच. मी भुमीपुत्र, स्थानीक, मराठी आहे आणि वर मुंबईत रहातो हा माझा गुन्हा आहे का रे ? आम्ही मांसाहार करतो ती आमची जीवनपद्धत आहे. म्हणुन काय आम्हाला आमच्याकडे घरे विकत घेण्यासाठी पैसा असुन सुद्धा बिल्डरनी घरे विकू नयेत का रे ? परप्रांतीयानी आम्हाला केवळ आम्ही मांसाहारी आहेत म्हणुन आमच्या राहात्या जागेतुनही हुसकवुन लावावे काय रे ? दुर्देवाची गोष्ट म्हणजे काही बिल्डर तर आमचेच भाऊबंद आहेत रे ! आमच्यातल्या शाकाहारी माणसांना आम्ही शाकाहारी आहोत , शाकाहारी आहोत हे दुनीयेला ओरडुन सांगायला लागण्याची, अमराठी लोकांना पटवुन देण्याची वेळ का बरे आली रे ?
आमचा कोणीच वाली नाही का रे ? विक्रमा, अधिक माहीती साठी दि. ९ मे रोजी महाराष्ट टाईम्स मधे आलेला श्री. संजीब साबडे यांचा " शाकाहारी वस्त्यांतील घरं महाग " या विषयावर लिहलेला लेख वाच, आजच्या म.टा. मधले "शाकाहारी वस्तांना मराठी शाकाहारीही नको आहेत " हे श्री.अरुण जोशी , गिरगाव यांचे पत्र वाच.
विक्रमा आता समाज त्यांच्या आहारशैलीवर विभागाला जावु लागला आहे रे ! काहीतरी कर रे , आता तुच आमचा वाली ,आमचा तारणहार, तुच आमचा नेता.
वेताळा, मी तुला याबाबतीत काहीच मदत करु शकत नाहीरे, मला पुढच्या शंभर पिढ्यांची तरतुत करुन ठेवायची आहे, शेवटी पैसा हेच जीवनसर्वस्व, हाच सखा, हाच आप्त, आणि हाच शाश्वत. बाकी सारे झुठ. तु गावाकडे किंवा लांब उपनगरात दुसरे झाड बघ. हवेतर त्यास मी तुला सहायता करीन.
विक्रमा तु बोललास, पण हा मी असा उडुन जावु कुठे रे ?
आणि शेवटी अगतीक वेताळ उडुन जावुन परत आपल्या झाडावर लटकु लागला, दोन दिवसात फांदी खाली करण्यासाठी.
3 comments:
:((
छान लेख. अनेक गंभीर विषयांना तुम्ही हसत हसत हात घातला आहे.
जीवनशैलीवर आधारिय वसाहत स्थापन करण्यात काही गैर नाही. एका विशिष्ट विचारसरणीचे लोक त्या निमित्याने एकत्रं येतात. उदा. आमच्या घराजवळ व्हिजिटेरियन कम्युनिटी, वॉकिंग कम्युनिटी, ख्रिश्चन कम्युनिटी अशा इंटेंशनल कम्युनिटीज आहेत.
पण त्या नावाखाली विशिष्टं समाजाच्या लोकांना प्राधान्य मिळत असेल तर ती बाब फारच गंभीर आहे. त्यावर उपाय म्हणजे प्रत्येक वसाहतीत मराठी आणि अमराठींचा एक किमान गुणांक असावा. सिंगापूरमधे असा नियम आहे त्यामुळे वसाहतींमधे भारतिय, चिनी आणि इतर वशांच्या लोकांचे सारख्याप्रमाणात विभाजन झाले आहे. नाहीतर आपल्या इथेही घेटो तयार व्हायला वेळ लागणार नाही. आधीच बहुतेक मुसलमान वस्त्या, सिंधी वस्त्या वेगळ्या आहेतच - त्यात आता शाकाहारी,मांसाहारी,फक्तं अंडी, कांदा लसूण नं चालणार्या अशा वस्त्या तयार व्हायला वेळ लागणार नाही.
शाकाहार हा शब्दं इंग्रजी व्हेजिटेरियन या अर्थाने वापरला तर दूध हे द्रवरूपी मांस आहे ह्या मनेकाच्या मताशी मी मात्रं १०१% सहमत आहे. झाडापासून निघणारे अन्नंच फक्तं शाकाहारी असू शकते.
त्या अर्थाने भारतात मनेकांसारखे मूठभर लोक सोडले तर कोणीच शाकाहारी ठरत नाही.
आपली चपखल प्रतिक्रिया खुप विचार करण्यासारखी आहे. आमच्या ईमारतीत, colony. society मधेतर नकोच पण संपुर्ण विभागात ही कोठेही मांसाहरी उपहारग्रुह असु नये, येथे मासमटण, मच्छी विकता कामा नये. म्हणजे अती झाले.
Post a Comment