Wednesday, December 05, 2007

आज रामशास्त्री हवे होते.

शाब्बास, भले बहादुर, शाब्बास , शर्तीने वाघ मारलात, फार मर्दुमुखी केलीत, मोठे शौर्य गाजवलेत, आपला जीव धोक्यात घालुन एका निरपराध वाघीणीला मारलेत. आता माहीती पडले, मारले गेलेले श्वापद भलतेच होते, नरभक्षक नव्हते.

मग बिघडले कोठे ? पुराण काळात पांडवांनी खांडव वन नाही का जाळले ? त्यातल्या सर्व पशुपक्षांना नाही का यमसदनी पाठवले, परीक्षीताने नाही का सर्पयज्ञ आयोजीत करुन समस्त सर्प कुळाचा वंशविच्छेद केला ? मानव जातीची कुरापत काढणाऱ्या वाघ्र कुळास अशी जीवघेणी सजा होणे जरुरीचे होते. आपण समस्त मानवसमाजाचे रक्षण केले आहेत.

लानत आहे, शरम वाटते, या निरपराध वाघीणीस अती उत्साहाच्या भरात, मागचा पुढचा विचार न करता मारणाऱ्या विचारहीन ,संवेदनाशुन्य माणसांचा, त्यांच्या विचारसरणीचा, त्यांच्या कृत्याचा.

या बेजबाबदार कृत्यात जे जे कोणी प्रत्यक्षपणे, अप्रत्यक्षरित्या जबाबदार असतील , या वधास जे जे कारणीभुत असतील, ज्यांनी ज्यांनी दबाब आणला असेल, प्रवॄत केले असेल त्यांच्या, त्यांच्या वर तत्काळ अटक करुन वन्यप्राण्यांच्या हत्येसंबधी असणाऱ्या सर्व कायदे कलामा नुसार खटले चालवुन त्यांना योग्य त्या शिक्षा झाल्याच पाहीजेत.
आज रामशास्त्री हवे होते.
सकाळ चा अग्रलेख - (खालील प्रमाणॆ )
बेपर्वाईचा मूक बळी!जंगलाची शान असलेल्या वाघांना वाचविण्यासाठी जगभरातील प्राणिप्रेमी, निसर्गवादी करीत असलेला आक्रोश महाराष्ट्राच्या वन खात्याच्या बंद कानांवर गेलेला नसावा. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्‍यात एका "नरभक्षक' वाघाला चार "शूटर'मार्फत गोळ्या घालून संपविण्याचे काम वन खात्याने नुकतेच पार पाडले. वन्य प्राण्यांच्या रक्षणासाठी असलेल्या या खात्याला प्राण्यांबद्दल किती प्रेम आणि आस्था आहे, हे यानिमित्ताने अधोरेखित झाले. ठार झालेला वाघ नरभक्षक होता की नाही, याची ठाम खात्रीही वन खाते देऊ शकत नाही. लोकांच्या म्हणण्यानुसार नरभक्षक वाघीण आहे. म्हणजे वन खात्याच्या कर्तबगारीमुळे निसर्गाच्या साखळीतील एक अनमोल जीव फुकाफुकी प्राणाला मुकला.

2 comments:

A woman from India said...

हे फारच निराशाजनक आहे. या पद्धतीने प्रकरण हाताळण्यात आले त्यावरून काही तरी चुक असल्याचा संशय तसा आधीच बळावला होता. माणसांच्या जंगल्यात शिरलेल्या वाघांना मारण्याचा उपाय सांगणारे कल्पनाशुन्यच नव्हे तर सरळ सरळ अपराधी आहेत. झोपेच्या इंजेक्शनची बंदुक अस्तित्वात आहेत हे त्यांना आम्ही सांगायला हवे काय?
मादीला मारणे म्हणजे तिच्यापासून झाल्येल्या पुढच्या पिढीलाही मारलेच.
या सर्वाला जबाबदार असणार्‍यांना कठोर शिक्षा करायला हवी या तुमच्या मताशी सहमत आहे.

प्रशांत said...

अत्यंत निंद्य कृत्य. जबाबदारांना शिक्षा व्हायलाच पाहिजे. पण प्रत्यक्षात 'नरभक्षक' वाघ/वाघीण अस्तित्वात होतं का? हा मुद्दा महत्त्वाचा वाटतो. खरोखरच अशी स्थिती असेल, तर 'नरभक्षक' समजून निरपराध प्राण्याचा वध तर झाला आहेच. पण खरा नरभक्षक वाघ शोधणं अत्यंत आवश्यक आहे.