I swear to God. परमेश्वरा शप्पथ. आता परत ह्या वास्तुची पायरी चढायची नाही. बस झाले, किती सहन करायचे ? अमर्यादित काळाला काही बंधन ? राजाभाऊंनी मनाशी ठरवलं, आता ठरलं म्हणजे ठरलं.
आधीच भुक खवळलेली, धीर धरणे कठीण होत चाललेले. दुपारचे जवळजवळ सव्वादोन वाजत येत चाललेले. आधीच भोजन करायला झालेला उशीर, जेवणाची वेळ टळुन गेलेली. ह्या अश्या मनाच्या आणि पोटाच्या अवस्थेत रांगेत उभे राहुन आपला नंबर कधी येईल ह्याची वाट बघणं नकोसे होत चाललेले. इनमिन दहापंधरा मिनिटॆच असावीत पण ती किती प्रदिर्घ होवुन गेलेली.
अखेर आत बोलवणे आले. त्या बाई उठल्यानंतर ह्या जागी बसा करुन आज्ञा झाली.
जेवण झाले. पानं उचलली. पण ..
एक चमचा वाटीत बुडला. वाटीत साबुदाणा पायसम. चमचा, चमच्यात पायसम, चमचा तोंडात, पायसम पोटात.
पुन्हा एक चमचा. पुन्हा एक.
चमचा काही साबुदाणा पायसम मधे बुडायचा थांबेना, पायसम काही संपता संपेना.
अखेरीस अन्नाने भरलेले ताट समोर आले, त्या आधी ताक , दही व स्वीट डिश ( कोणता पदार्थ होता हे संपला तरी कळले नाही ) आले.
एक वाटी गरमागरम रसम पोटात गेले, अगम्य चवीच्या अगम्य भाज्या खावुन झाल्या. तीनापैकी एक चवळीची व दुसरी कोबीची एवढेच कळले.
मग खरा आडवा हात मारणे सुरु झाले.
एक मुद भात रसम बरोबर.
एक मुद भात सांभार बरोबर.
एक मुद भात डाळीबरोबर.
आणि
एक मुद भात दह्याबरोबर.
चेवलेला भुकाग्नी शांत, अंतरात्मा तृप्त.
विडा चघळता चघळता, परमेश्वरा, कृपा करुन माझ्या म्हणण्याचा विपर्यास करु नकोस रे, मला मी परत येणारच नाही असे म्हणायचे नव्हते. मला असं म्हणायचे होते की मी गर्दीच्या वेळात "रामा नायक श्रीकृष्ण बोर्डींग " मधे जेवायला येण्याचे टाळीन म्हणतोय. या पुढे जरा लवकरच येत जावु असे खरं तर मला बोलायचे होते.