Monday, November 28, 2022

रामाश्रय

 राजाभाऊ आज फोर कोर्स डिनरला गेले.


रसम विथ भात, सांबार विथ भात, डाळ विथ भात, आणि दही विथ भात.


माटुंग्याच्या "रामाश्रय" ने समोरच आपली दुसरी शाखा उघडल्याचे राजाभाऊंच्या कानावर आले, मग काय त्यांच्याने रहावते काय ? धीर काय धरवतो काय ? 


रामाश्रय मधे दाक्षिणात्य थाळी खायला आज राजाभाऊ पोचले.


भाज्या अगम्य होत्या तो भाग वेगळा, एकही भाजी कसली होती नाही कळले. अर्थात ह्याची राजाभाऊंना कल्पना होतीच. जेवण तसे आवडले, रसम उत्तम होते. गरमागरम दोन वाट्या प्याल्यावर पोटात अग्नी पेटला होता.


पण,


पण रामा नायक यांचे श्रीकृष्ण बोर्डींग हाऊसच्या जेवणाच्या हे जवळपास फिरकत नाही असे राजाभाऊंचे वैयक्तीक मत झाले.


काळेकाकुंनी मसाला डोसा मागवला तो फार चवदार होता. 


"रामाश्रय" हे बहुदा नुकतेच उघडले असेल. जागा फार प्रशस्त आहे, छान आहे. जुन्या रामाश्रयपेक्षा येथे प्रसन्न वाटते.


ह्या जागी पुर्वी "सरस्वती" नावाचे उपहारगृह होते, ते बंद पडुन खुप वर्षे झाली होती. 


आता राजाभाऊंची द्विधा मनस्थिती झाली आहे. डोसे खाण्यासाठी जुन्या जागी जायचे की नव्या ? जुने सोडवत नाही आणि नविन धरवत नाही अशी अवस्था झाली आहे.












Wednesday, November 23, 2022

strawberry wine with strawberry

 Enjoying strawberry wine with strawberry at Mahabaleshwar




माळी धाबा.


राजाभाऊ एकदा रात्री इस्लामपुरला राहिले होते.

आयुष्यात प्रत्येक गोष्टीला प्रथम वेळ असते तशी राजाभाऊंच्या नशिबी पहिल्यांदाच अख्खा मसुर खाण्याची वेळ होती. आणि ह्या पदार्थाच्या प्रेमात ते पडले.

माळी धाबा. 





 

आजे नास्ता मां सु छे

 बराकभाई गुजराती भाषा बोलायला शिकले मग राजेशभाई तुम्हाला गुजराती शिकायला काय वांदा आहे ?

निदान खायला काय आहे ,आजे नास्ता मां सु छे इ.इ., हे गुजरातीतुन विचारायला तरी शिका. रोज कामाला येईल.




रवळी

 चोराच्या हाती लंगोटी म्हणत निदान ही "रवळी" तरी खायला पाहिजे होती.




आयकिया

 "आयकीया" मधला एकच कार्यक्रम.


काळेकाकुंची खरेदी आणि काळेकाकांची खादाडी.


राजाभाऊ केवळ ह्याच कारणास्तव "आयकिया" मधे राजीखुषी जायला तयार होतात." मधे राजीखुषी जायला तयार होतात.




Tuesday, November 15, 2022

गोविंदा

 हरे क्रिस्न. हरे क्रिस्न, क्रिस्ना, क्रिस्ना. हरे रामा हरे कृष्णा.

आपल्या बायकोचे फार कमी वेळा ऐकणाऱ्या राजाभाऊंनी आज मात्र तिचे ऐकायचे ठरवले व आपल्या निवडीला मुरड घातली आणि शुध्द , सात्विक , प्रसादाचे भोजन ग्रहण करण्यासाठी ते गिरगाव चौपाटी जवळ असणाऱ्या इस्कॉन मंदिरात असणाऱ्या "गोविंदा" मधे पोचले.

मेन्यु आपला नेहमीचाच. दम आलू काश्मिरी. या खेपेस "चटपटा पनीर " ची भाजी ट्राय करु करुन ती घेतली खरी पण ती भाजी खातांना राजाभाऊ सात्विक जेवणात तिखट भाजीचा समावेश असतो काय ह्याचाच विचार करत बसले.

जेवण मात्र येथे चांगले, चविष्ट असते ही बाकी खरं.







Monday, November 14, 2022

कॅफे भोसले

 मासे खाणाऱ्यांची गोव्यात चंगळ असते. पण इतरांचे काय ? 

शाकाहारी राजाभाऊंना फोंड्यामधे एक उत्तम जागा सापडली.


जेवण अजुन आठवणीत आहे.






पंचम पुरीवाला

 काही जागा आपल्या स्मरणशक्तीत एवढ्या कोरल्या गेलेल्या असतात की तेथे जेवायला जाऊन युग लोटली असतात पण मनात त्याची आठवण ताजीच असते. असे वाटते काल परवाच गेलो असावे.


ह्या "पंचम पुरीवाला" कडे पुरी आलुची पातळभाजी फार उत्तम मिळते (दुसरी भाजी बहुतेक भोपळ्याची असते, आता आठवत नाही). आहे अगदी साधे उपहारगृह. स्वस्त आणि मस्त. तसं बघायले गेले तर येथे उत्तर भारतीय पद्धतीचे भोजन तसेच अनेक भाज्या वगैरे मिळतात, पण राजाभाऊ येथे कायम पुरीभाजीच खात आले आहेत.


कधीतरी आता मुद्दाम ठरवुन जायला हवे.





















गुजराती पध्दतीची गोड डाळ

 आज राजेशभाईंच्या घरी भाभीं नी गुजराती पध्दतीची गोड डाळ केली होती. मस्तपैकी शेंगदाणे वगैरे घालुन. डाळढोकळी मधे असते काहीशी तशी.  आता प्रत्येक वेळी ती आपल्या वाटीत ओतुन घेण्यापुर्वी दहावेळा त्यांना विचार करावा लागत होता ते गोष्ट वेगळी, भांड भर डाळ केवळ आपल्यासाठीच बनवली आहे, घरात दुसरे कोणीही जेवायला नाहीत असा त्यांचा गैरसमज जो झाला होता. 

तर  अशी टेस्टी डाळ ओरपतांना त्यांच्या आठवणी जाग्या होवु लागल्या, आपण अशी डाळ कुठे खाल्ली होती आणि जे खाद्यगृह आता बंद पडले आहे.

मेट्रो चित्रपटगृहाच्या कुशीत "राजधानी " चे एक उपहारगृह आले होते. येथे गुजराती थाळी मिळत नसे. पण इतर खाद्यपदार्थ खरोखरीचे चांगले मिळायचे.  आता सगळंच गुजराती  गोड मानुन घ्यायचा जमाना आला आहे बाब अलग. 

येथे आयुष्यात पहिल्यांदाच डाळढोकळी खाल्ली, भाताबरोबर. खुप आवडली होती.

मग कधीतरी ते बंद झाले.

निसर्गोपचार आश्रमात

 राजाभाऊंनी सर्वांना प्रणाम करत उरुळीकांचन येथील निसर्गोपचार आश्रमात पावुल ठेवले. 

दिवस पहिला. 

सर्व सोपस्कार पार पडले. 

सकाळचे साडेदहा. 

राजाभाऊंची पावले आपसुकच भोजनगृहाकडे वळली.

उकडलेली तोंडल्याची  भाजी,  बिन तिखटाची, मिठाची, मसाल्याची . सोबत नाचणीची भाकरी.

संध्याकाळचे साडेसहा.

उकडलेली डांगराची भाजी. बिना तिखटाची, मसाल्याची , बिना मिठाची. सोबत नाचणीची भाकरी.

दिवस दुसरा.

सकाळचे सात. 

गरमागरम काढा. पोटात काहीतरी गेल्याने अंगात कशी हुशारी आली.( जी हुशारी एनिमा घेतल्यानंतर बाहेर पडली.)

वेळ सकाळची सव्वादहा.

उकडलेली कोबीची भाजी. बिन तिखटाची, मिठाची, मसाल्याची . सोबत नाचणीची भाकरी.

उत्साह हळुहळु मावळायला लागला. पण काळेकाकुंनी मात्र कमाल हो. अजुनही त्या उत्साहाने खिंड लढवत होत्या.

दुपारी परत एकदा काढा. 

उपाशी पोटी परत जरा तरतरी वाटु लागली.

वेळ संध्याकाळचे चार. 

नजर राहुन राहुन घडाळ्याच्या काट्‍याकडे वळु लागली.

वाजले एकदांचे सव्वासहा.

उकडलेली फ्लावरची भाजी. बिन तिखटाची, मिठाची, मसाल्याची . सोबत परत एकदा नाचणीची भाकरी.

दिवस तिसरा. 

वेळ सकाळची.

राजाभाऊंची पावले ह्या वेळी भोजनगृहाकडे वळण्याच्या ऐवजी कार्यालयात वळली.

"मला डिस्चार्ज हवायं "

राजाभाऊ शिरले प्रथम देवळासमोरच्या घरात.

 आता नागेशीच्या दर्शनाला गेलेल्या माणासाने मुकाट्‍याने देवदर्शन करावे व बाहेर पडावे.

पण नाही.

राजाभाऊ शिरले प्रथम देवळासमोरच्या घरात.






Tuesday, November 08, 2022

स्नोमॅन्स

 आणि दुसरी जागा म्हणजे वॉर्डन रोडवरचे " स्नोमॅन्स "

"सॉफ्टी " आईसक्रीम म्हणजे काय असते हे ह्या मुळॆ समजले. चांगले ग्लास भरुन यायचे. त्या काळी जरा नवलाई वाटायची.  असचं रात्री कधीतरी गाडी काढायची येथे खायला जायचे.  येथल्या  माहोलची मजा घेत घेत मस्त पैकी " सॉफ्टी " चाटुन पुसुन खायची. 

कधीतरी हे बंद झाले आणि त्याची जागा "Gelato " आणि "MOD" नी घेतली.  आता त्या जागी कधीच्या काळी  जाणॆ होते, खास दरात मिळत असल्यामुळे. पण आता बाजारात आलेली नविन नविन कितीही आईसक्रीम  खाल्ली तरी "स्नोमॅन" ची चव विसरणे नाही.

यांकी डुड्ल्स

 आयुष्यात दोन ठिकाणांची उणीव फार जाणवते. 

उपहारगृह येतील आणि जातील ही, पण मरीन ड्राइव्ह वरच्या नटराज हॉटेलमधे तळमजल्यावर बाहेरच्या बाजुस असलेल्या "यांकी डुड्ल्स " सारखे दुसरे आईसक्रीम पार्लर परत येणे नाही. 

रात्र चांगली चढत गेली की गाडी काढायची ,  नटराजच्या कोपऱ्यावर असलेल्या ह्या उघड्यावरच्या ठिकाणी मोकळ्या हवेत, समुद्रावरुन येणाऱ्या वारा अंगावर घेत, तिच्याबरोबर  "चिक चॉक " , "कसाटा " खाणे ते ही फक्त दोघांसाठीच असलेल्या झोपाळ्यावर बसुन. गप्पा गोष्टी करत. लग्न नुकतेच झालेले.

कधी झोपाळा रिकामा नसायचा मग आपला झालेला विरस आईसक्रीम खात खात विसरुन जाणॆ.  

खुप मस्त दिवस ते होते.

सिक्स्थ सेन्स

 असच एकदा वैतागुन लिहिलेले.

’सिक्स्थ सेन्स ’ या वातानुकूलीत आणि अत्याधुनिक मॉलच्या तळमजल्यावर "व्हेज ऑलवेज" नावच रेस्टॉरण्टही सुरू केलं आहे. येथे कॉन्टीनेण्ट्ल, इंडीयन, चायनीज असं तिन्ही प्रकारच हेल्दी, चविष्ट फूड मिळेल. एखादं रेस्टॉरण्ट समोरुन कितीही स्वच्छ दिसतं असलं तरी त्यांच किचन मात्र अस्वच्छच असणार हे आपण गॄहीतच धरलेलं असतं. पण "व्हेज ऑलवेज"चं किचन अतिशय स्वच्छ व प्रशस्त आहे. विशेष म्हणजे इथे आलेला प्रत्येक खवय्या किचनमध्ये जेवण कसं तयार केलंजातं हे समोर लावलेल्या स्क्रिनद्वारे प्रत्यक्ष पाहूही शकतो आणि दुसरीकडे मॉकटॆल काऊण्टरवरुन आपल्या आवडत्या मॉकटेलचा आस्वादही लुटु शकतो.

वर्षारंभ विशेष, महाराष्ट्र टाइम्स मधे उपहारगृहाचे वर लिहीलेले वर्णन वाचले. मुंबईत एखादे मस्त उपहारगृह सुरु झाले आहे आणि आपण अजुन त्याला भेट दिली नाही काय हे राजाभाऊ ? 

प्रभादेवी एवढाच उल्लेख वर्तमानपत्रात आला होता, तो धागा पकडुन राजाभाऊ सहकुटुंब सहपरीवार भोजन करायला निघाले. शोधत शोधत असे वाट पुसत पुसत , अरे मराठी माणसानी एवढे मॉल उभारले पण या परीसरातील कोणालाच काहीच ठावुक कसे नाही याचा विस्मय करीत दरमजल करीत अखेरीस परळ एस्टी डॆपो मागे, झेंडु फार्मसुटीकल समोर पोचले. आणि

न जेवता ही तृप्त होवुन ते परतले.

धन्य त्या वार्ताहराची. अजुन कशाचा कशाला पत्ता नाही. बांधकाम सुरु आहे, अर्धवट अवस्थेत सर्व काही आहे आणि त्या आधी तो पठ्ठाने आम्हाला चक्क जेवायला तेथे धाडले.

टॅक्सीचे बिल, झालेल्या मनस्तापाची भरपाईची रक्कम त्या वार्ताहराकडुन वसुल करायला हवी.

ता.क. 

पण एकदा का राजाभाऊंनी खाण्याच्या बाबतीत ठरवले की ठरवले. ते सतत हे सुरु झाले का याचा सुगावा काढत राहिले आणि जसे सुरु झाले तसे ताबडतोब तेथे जेवायला पोचले. जेवण, आतले वातावरण आवडले होते.

हे उपहारगृह बहुतेक बंद झाले आहे..

मेलूहा द फर्न

 कमाल आहे. "मेलूहा द फर्न " नामक एखादे हॉटेल अस्तित्वात आहे ह्याचा शोध राजाभाऊंना अगदी कालपरवाच लागला. 

संध्याकाळी आधीच भुकेने अतिक्रमण केलेले, त्यात परत साकीनाका, चांदिवली येथला ट्रॅफीक जॅम. 

"Tiara , All Day Dinning " ह्या त्यांच्या रेस्टॉंरंटमधे प्रवेश केल्याकेल्या मन एकदम प्रसन्न होवुन गेले. प्रशस्त जागा आणि उत्तम अंतर्गत सजावट.

गेल्यागेल्या राजाभाऊंनी आपला मोर्चा "सुप"कडे वळवला.  सुपचे नाव काही आता लक्षात नाही पण एक मात्र खरे की ते पितांना भाताच्या पेजची सतत आठवण येत होती. मग राजाभाऊंनी आपली सद्यस्थिती लक्षात घेता जरा हलकेसे खाण्याचा निश्चय केला. मात्र  हे मनोबल जेवणाच्या शेवटी डेजर्ट खाण्याची वेळ आली तो पर्यंत टिकले नाही ही गोष्ट वेगळी. 

चालायचंच.







रमण विलास

 भर रस्त्यात समोरुन येणाऱ्या एका गृहस्थाची वाट अडवुन राजाभाऊ मधेच उभे राहिले आणि त्यांना जाब विचारला. 

तुम्ही असे का केलेत ? तुम्ही असे का वागलात ?

ते गृहस्थ काहीच बोलले नाहीत. शांत मुद्रेने त्यांनी राजाभाऊंकडे पाहिले व प्रसन्न होवुन खुप गोड हसले. त्यांना झालेली खुषी त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसुन येत होती. त्यांना हा प्रश्नाचा आनंद झाला होता.

"तुम्ही तुमचे "रमण विलास " का बंद केलेत ? "

शाळेसमोरचे , दोन देवळासमोरचे ते दाक्षिण्यात पदार्थ मिळण्याचे उपहारगृह होते. अस्सल अगदी अस्सल डोसे तेथे मिळत. राजाभाऊंना रवा डोश्याची चव आणि चटक लागली ती ह्यांच्याच मुळे.छोटेसेच हे उपहारगृह होते

आजच्या रात्री गिरगावात जातांना ह्या शाळेतल्या सुखद आठवणी जाग्या झाल्या आणि ती जागा, ती चव आठवु लागली. 

मग कधीतरी त्यांनी हा व्यवसाय बंद करुन स्पेयर पार्ट्सचे दुकान टाकले. हे या वस्तुंचे मार्केट .

हे R.T.I म्हणजे Right To Information Act नव्हे तर Ratanbai Tata Institute

 किती तरी दिवस झाले राजाभाऊंच्या डोक्यात R.T.I नुसतं घुसुन राहिले आहे.  

R.T.I  मधे कधी मागवायचे, मागवायचे  करता करता दिवस पुढे भराभरा सरकत चालले आहेत. पण  हे R.T.I   प्रकरण काही हाती लागत नाहीयं. 

किती वेळा त्याच्या जवळ जाणॆ झाले पण तरीही लांब रहाणे झाले..

आता उद्याला नक्कीच मधे R.T.I  डाल नी पोरी, भाकरा, चॉकलेट टार्ट, लेमन टार्ट , केक , बटाटा वडा आणायला जातोच.  येथे पारसी पध्दतीचे जेवण पण चांगले मिळते असे ऐकुन आहे. पण शाकाहारी असल्यामुळॆ त्यापासुन दुर रहावे लागते. 

हे R.T.I म्हणजे Right To Information Act नव्हे तर Ratanbai Tata Institute. ह्युजीस रोड वरचे.

यांनी मध्यंतरी त्यांच्या जागेत एका हॉलमधे रेस्टॉंरंट सुरु केले होते . मला वाटतं ते फक्त रविवारीच सुरु असायचे , बुफे लंच साठी. सध्याला बुफे मिळतो का नाही ते ठावुक नाही.

एक सफर सराफाची, इंदौर ची

 एक सफर सराफाची, इंदौर ची. बचेंगे तो और भी खायंगे. 

ओ बॉगवाले भय्या, जन्माला यावे, मस्तपैकी मनसोक्त्त खावे, पण चवीचवीने, आस्वाद घेत, तबीयतनी, मग सराफात न जावुन कसे चालेल? इंदौरला यावे, रात्रीअपरात्री राजवाडयाजवळील सराफ्यात फेरफटका मारावा व तब्बेतीने एकसोएक बढीया पदार्थ खावे, वर मस्तपैकी रबडी, मालपुवे, खावुन शीकंजी रिचवावी, आयुष्य सार्थकी लागले म्हणायचे. वैशिष्ट म्हणजे खाण्याचा प्रत्येक पदार्थ सजधजके आपल्या पुढे नजाकतीने पेश केला जातो, त्यानेच मन कसे प्रसन्न होते. 

इंदौरला छप्पन बझार तसा आमच्या घराजवळ. सर्वप्रथम विजय चाट हाउस मधे गरमागरम खोबरा कचौरी, पॅटिस, ते पण लाजबाब तिखटमिखट, गोड, चटण्यात डुंबलेले, हाणावे. वरती बटाट्याचे आवरण, आत मधे खुसखुशीत खोबऱ्याचे सारण, चोय. मग दोन पावले जरा चाललो की "मधुरम" हे सुप्रसिद्ध मिठाईचे दुकान लागते, तेथे मधे गुलकंद भरलेली काजुकतरी मिळते तीचा आस्वाद घ्यावा, जवळील ओम के नमकीन मधे जावे, नमकीन चे शेकडो प्रकार बघुन पागल व्हावे, नमकीन हाणत घरी परतावे हा एक दिनक्रम. मग कधीतरी उपवासाच्या दिवशी कोठारी मार्केट समोर फरीयाली साबुदाणा खिचडी खायला जावी. आपण खातो ती साबुदाणा खिचडी एकदम सपक. रसहीन. रंगहीन. खिचडीवर साध्या, तिखट बटाटा वेफर्सचा, सळी, जाळी वेफर्सचा चुरा पेरावा, लालचुटुक डाळीबाचे दाणे, तिखटमाखट शेंगदाणे पेरावेत, रंगांची उधळाण जराशी वाढावी म्हणुन बारीक चीरलेली कोथींबीर पेरावी, मग मसाला भुरभरावा, खावी पण वेफर्सच्या साहाय्याने. मग समोरील स्टॉलवर फ्रुटचाट खावा, ब्रम्हानंदी टाळी. 

पण ही म्हणजे एक रंगीत तालीम. सराफ्याची चव घेण्याआधीची. सावधान. सराफात प्रवेश करताना काळजी घ्यावी. सकाळी आहार माफक असावा, पोट पुरते रिकामे असावे, मुखवास, पाचकचुर्ण, हिंगगोली, जीरागोळी, आल्याचा रस, वेळप्रसंगी जेलुसील वगैरे तयार असावे, अती खाण्याने त्रास होवु शकतो, पण तो वेळोप्रसंगी सहन करण्याची तयारी ठेवावी, सकाळी बायकोला घेवुन सराफा मधे गेलो कि दागदागिन्याच्या मोहापायी खुप खर्च होण्याची शक्यता असते. 

रात्री सराफातील सोन्याची दुकाने बंद झाली की मग त्याचे रुप पालटू लागते. हलवाई आपले थाळे घेवुन रस्तावर प्रगट होवु लागतात. जातीच्या खव्वयांची वर्दळ वाढू लागते, रात्र उत्तरोत्तर रंगु लागते. थाळ्यांवर, कलथे आपटल्यावर त्यातुन निर्माण होणारा मधुर नाद कानी पडाता, भुक प्रज्वलीत होवु लागते. 

सराफाची प्रवेशाची सुरवातच मोठी लज्जतदार असत, दोन्ही अंगाला खुप चांगली दुकाने आहेत. उजवीकडील विजय चाट हाउस मधे प्रथम गरमागरम खोबरा पॅटीस, कचौरी (चटणी मारके) खावेत, पॅटीसची चव चटणीमुळे वाढते की चटणीची चव कचौरी मुळे, या वादात जास्त लक्ष न घालता, बाजुलाच फळांचे रस व आईस्क्रीम चे दुकान आहे, त्यात तहान भागवण्यापुरते रस पियावा, डाव्या बाजुला मग गरमागरम भल्यामोठाल्या कढईतील गुलाबजामुन मोहवीत असतात. पण ते जास्त हादडुन चालण्यासारखे नसते, कोणा लेकाला पहिल्याच फेरीत गारद होण्याची इच्छा असते? वरती परत मालपुवे ने नॉक आऊट होवुन सुद्ध्या चालणार नसते. बचेंगे तो और भी खायंगे. 

मग आत शिरले की डाव्या हाताला लागते ते दुकान ज्यात, जगप्रसिद्ध, सुविख्यात " जोशी के दहिबडे " मिळतात, काठोकाठ दह्याने भरलेला द्रोण त्यातले ते वडे, हा द्रोण भरताभरता दुकानदार हवेत उंच कसा उडवतो ते न्हाहाळत मटवावेत. होशीयार , खबरदार, अजुन तळलेले गराडु, वर लिंबु पिळुन, मसाला भीरभीरुन, सादर केलेले चाखायचे आहेत. जर "भुट्टे का कीस" नजर अंदाज झालाच तर या चुकीस क्षमा नाही. आपल्याला रताळाचा कीस, बटाट्याचा कीस खाल्यामुळे माहीती आहे, पण मक्याच्या दाण्याचा हा आपल्या पुढे नजाकतीने, आब राखुन, थाटात पेश केलेला हा भुट्टे का कीस , आपणच संस्थानीक असल्याचे जाणवुन देतो. 

आता गोड जास्त झाल्यावर या वर उतारा म्हणुन मग तिखटाला छोलेपॅटिस, आलु तिक्कीया बरे शोभतात. मग गव्हर्नरची गाडी साठी रस्ता मोकळा करायलाच हवा, अरे जिलेबीवाले भय्या, एक किलो जिलेबी खिलाईये. मग आपल्या समोर हलवाईजी जिलेबी करायला घेणार. आपल्या कडॆ मिळतात तश्या लहान लहान आकाराच्या नव्हे तर एकच भली मोठी. जी खायला काळीज ही सिंहाचे लागते. आपल्या कडच्या चार-पाच जिलेबी जरी खाल्या ना तर त्या केवळ दातामधल्या कॅवेटीतच जातात, पोटात जाणे दुरच. वर एक ग्लास गरमागरम दुध, तबियत खुश झाली पाहिजे.

हे सारे खावुन झाले की अखेर भैरवी, शिकंजी किंवा रबडी शिवाय सुटका नाही. 

हे सारे पचायला मदत हवीच. मुखवास, जीरागोळ्या चघळत तबीयतशीर घरी परतावे.

मग कधीतरी रात्री काचमंदीर समोरील उपहारगृहात जावे. किंवा सराफामधील राजहंसमधे, तेथे डालबाफले मिळतात ते भरपुर किलोकिलोनी तुप घालुन खावे.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठावे ते केवळ राजवाडयाजवळ पोहे खाण्यासाठी व पलाशिया तील अगरवाल या मिठाईच्या दुकानात किंवा छावणी मधील मथुरावाला मधे मिठाई खाण्यासाठीच.

मन तॄप्त, चीत्ती समाधान.

सराफा. इन्दौर

 प्राण कंठाशी येणॆ किंवा अती खाणे मसणात जाणॆ. 

सराफा. इन्दौर. 

प्रत्येक सराफावाले भय्यांच्या हातचे थोडे, थोडे खाण्याचा विचार आणि अट्टाहास, आणि धाडसी साहस.

सराफाच्या प्रवेशद्वारापासुन केलेली सुरवात. शेवट भल्यामोठ्या जिलेबीने केलेला. भुट्टे का किस वर मन जरा जास्तच रेंगाळलेले.

हिंग, पोटात घेणे, पोटावर लावणं, लिंबुसरबत आल्याचा रस घालुन. सोड्याचा मारा.

गडाबडा लोळणॆ. जीव घाबराघुबरा होणे, प्रचंड महाप्रचंड पोटात वेदना. असह्य कळा.

खोबऱ्याच्या कचोऱ्यांवर जरा कमी ताव मारला असता तर ? गराडु खाणॆ पुढच्या वेळीसाठी राखुन ठेवले असते तर ? वाटॆत कोठारी जवळ जरासी साबुदाणा खिचडी चाखुन पाहिली नसती तर ? 

देवा , अरे देवा, नाही सहन होत नाही.

देवा, आजची रात्र पार पडो, उद्याला "मधुरम" मधे गुलकंदवाली कतरी खायला नाही जाणार.

छप्पन,, मधुरम. दुकानात जेवढ्या बरफी आहेत त्यांचातला प्रत्येकी एकएक पीस खाण्याचा विचार. अटटाहास. आणि साहसी धाडस.

मॉकटेल

 "Asilo " मधे जावुन राजाभाऊ पिवुन पिवुन काय प्याले असतील तर "Frozen Passionfruit &  Orange " नामक एक मॉकटेल व त्या नंतर "Vergin Mary"

Kokam Blend , Kokam, fresh lime & Lemonade " पिण्याची खुप इच्छा होती. पण मग विचार केला ह्या एका ग्लासला मोजायला लागणाऱ्या पैश्यामधे आपण आयुष्यभर घरी बसुन मस्तपैकी जीरेपुड वगैरे घालुन थंडगार कोकम सरबत पिवु की

डाळींबीत डाळींबाचे दाणे कोठे आहेत

 आता तुमच्या समोर उपहारगृहात बसलेले गृहस्थ वेटर बरोबर वाद घालु लागले तर तुम्ही काय प्रतिक्रिया द्‍यावी ?

"डाळींबीत डाळींबाचे दाणे कोठे आहेत ? "

" का नाहीत ?"

जनता चिक्की

 राजाभाऊंवर काय ही वेळ आली आहे ? दिवाळीत फराळावर आडव हात मारायचा सोडुन ते राजगिऱ्याच्या चिक्की खात बसलेत. 

प्रार्थना समाज येथील "जनता चिक्की " मधे छान चिक्की  मिळते.