आधीच बागेश्री राग अस्मादीकांना घायाळ करणारा, "सखी मन लागेना, ना जानु बालमवा मिलन कब होगा, प्रीत लगाके पछता रही सखी मन लागे ना". कल के कलाकार संमेलनाने आपल्या देश्याच्या भौगोलीक सीमा यंदाला ओलांडल्या, शुक्रवारी चक्क इटालीचे रिकार्डो बटाग्लीया यांचे, मुंबईच्या राजदीप बारोट समवेत सरोद वादन होते. त्यात त्यांनी बागेश्री राग सादर केला. दिल खुश हुवा. लखनौ वरुन आलेल्या मोहंमद रईस खान यांनी सारंगीवर वाजवलेला राग यमन ही लोभावुन गेला.
गुरुवारी मुंबईच्या श्री. विनायक प्रभु यांचे गायन सर्वात उत्तम झाले असे ऐकले, नेहमी प्रमाणे मी ते ऐकायला नव्हतो.
या दिवशीचे प्रमुख आकर्षण होते ते पखावाज कचेरीचे, यात बहार आणली श्री. वरुण कुमार झा ,संगीत कुमार पाठक, अनिरुद्ध शिर्के, विवेकानंद कुरांगळे व प्रताप पाटील यांनी. पाच पखावाज एकत्रपणे वाजताना ऐकणे हा एक सुखद अनुभव असतो. दुसरे आकर्षण होते ते श्री सतीश क्रूष्णमुर्ती यांचे म्रूदुंगम वादन. त्या आधी श्री. हिमांशु नंदानी आपल्या बासुरी वादनानी लोकांना नादावले होते. तबल्यावर त्यांना साथीला होते ते दोन दिवसापुर्वी बेला बहार वाजवलेले श्री. नवीन गंधर्व.
आयुष्यात प्रत्येक घटनेला शेवट असतोच, त्या प्रमाणे कल के कलाकार संमेलन काल रविवारी २७/०५/०७ रोजी तबला कचेरीच्या शेवटच्या कार्यक्रमाने समाप्त झाले.
या चांगल्या गोष्टी संपताना हुरहुर लावुन जातात. काल माझ्या मुलास मी मारुनमुटकुन शेवटच्या सत्रास घेवुन गेलो व जबरदस्तीने, रडतरखडत त्याला शेवट पर्यंत बसवले. त्याला ही तरुण पिढीचे गुण कळले पाहीजे. तो गिटार शिकत आहे. मग मला वाटते त्याला ही कुठेतरी मनात हे जाणवले असावे.
No comments:
Post a Comment