Friday, May 18, 2007

कल के कलाकार संमेलन - एक अस्मरणिय अनुभव न चुकवण्यासारखा




वर्षभर ज्याची वाट पहात होतो ते " कल के कलाकार" संमेलन आज पासुन मुंबईत सुरु झाले. उदयन्मुख, तरुण, प्रतिभाशाली, गुणी कलावंताचा ओघ , आसेतुहिमाचल, संपुर्ण देशातुन, आज पासुन पुढील सबंध आठवडाभर मुंबईत सुरु झालेला आहे, या कल के कलाकारांना पहाण्याची, ऐकण्याची, सुवर्णसंधी आपल्याला केवळ सुर सिंगार संसद याच्या मुळेच मिळते. गेली कित्येक दशके देशाच्या कानाकोपऱ्यातुन उत्तमोत्तम तरुण कलावंताचा शोध घेत, त्यांना प्रोत्साहन देत , पुढे येण्याची संधी मिळवुन देण्यासाठी, त्यांना आपली कला रसीकांपुढे सादर करण्यासाठी योग्य ते व्यासपीठ मिळावे या चांगल्या हेतुने ही संस्था हे संमेलन आयोजीत करत आले आहे. आजच्या अनेक महान कलाकारांनी आपल्या सुरवातीच्या काळात या संमेलनात आपली कला पेश केली होती, हे विशेष.

आता पर्यंत आपण कालच्या कलावंतांना खुप पाहात आलोय, ऐकत आलो आहोत, केव्हा केव्हा वेळ प्रसंगी सहनही करत आलो आहोत (माफी असावी). आज काळाची गरज आहे ती आपण या "कल के" उद्याच्या कलाकारांना, प्रोत्साहन देण्याची, आपली दाद देण्याची, शाबासकी देण्याची. परत वरती हा कार्यक्रम विनामुल्य असतो. कदाचीत याला हजेरी लावणे हे स्टेटस सिंबॉल नसावे, या संमेलनाचे महागडे टिकीट नसावे म्हणुन दुर्देवाने या एका सुंदर कार्यक्रमाला लोकांची फार कमी प्रतीसाद मिळतो, त्यांची उपस्थिती तुरळक असते. याचा मात्र बराचसा दोष आयोजकांकडे जातो असे मला वाटते. या संमेलनाची पुरेशी माहीती लोकांपुढे पोहोचतच नाही, वर्तमानपत्रात तर याची जाहीरातच दिली जात नाही, प्रेस रिलीज ही दिले जात नसावे. लोकांना कळणार कसे ? कदाचीत ही संस्था आर्थिक अडचणीतुन जात असावी, हॉलचे वाढीव भाडे न परवडल्याकारणे यंदाचे संमेलन रद्द होणार होते. विद्यापीठाने कमी पुर्वीच्याच दरात हॉल उपलब्ध करुन दिल्यामुळे आज हे संमेलन होत आहे. ही बाब आपल्या सर्व रसीकांसाठी, कलाप्रेमींसाठी लांछनास्पद आहे. ज्या समाजात कलेची जोपासना करणाऱ्या एका संस्थेवर ही वेळ येवु शकते त्याला काय म्हणावे ?

दरवर्षी मे महिन्यात हे संमेलन विद्यापिठ विद्यार्थी भवन , बी रोड, चर्चगेट, येथे आयोजिले जाते. आजच्या कार्यक्रमाची सुरवात रोरकेला येथुन आलेल्या श्री देबाशीश पटनाईक यानी ओडीसी नॄत्याने केली. दि. १८ ते २२ पर्यंत ओडीसी, भरतनाट्यम, कथ्थक, मोहीनी अट्ट्म, आदी नॄत्यप्रकार सादर केले जाणार आहेत, २३ मे ते २६ मे रोजी शास्त्रीय संगीत ( गायन व वादना) चे कार्यक्रम होतील. वेळ संध्याकाळी सहा वाजता. रोज ८/९ कलाकार असतात.

२५ मे रोजी शेवटी पखावज कचेरी व २६ व २७ मे रोजी तबला कचेरी चा कार्यक्रम तर चुकवुन चालणार नाही, ५ पखावज १ मॄदुंगम तसेच १० तबला एकदम वाजताना ऐकणे वेगळीच अनुभुती असते. २८ मे रोजी भजन संमेलन, २६ मे रोजॊ श़बे गज़ल, ३० मे रोजी जयदेव हिदी चित्रपट संगीत संमेलन ही आहे. चार पाच महीन्यापुर्वी स्वामी हरीदास संमेलनही झाले, केव्हा झाले कळलेच नाही.

आज मात्र माझ्या नशीबात आजचे कार्यक्रम बघणे लिहीले नव्हते, घरगुती अडचणी मुळे, लगेचच उठुन यायला लागले. अभी रात बाकी है , बचेंगे तो और भी देखेंगे.

No comments: