Monday, December 20, 2021

इडली हाऊस

आणि एक वर्तुळ पुर्ण झाले.

स्पर्धेत टिकुन रहाण्यासाठी उडपी उपहारगृहांनी आपल्या मेन्युत आतापर्यंत काय काय, अनेक बदल केले, देशोविदेशाच्या नवनव्या खाद्यपदार्थांची त्यात भर टाकली ( फक्त मराठी खाद्यपदार्थ सोडुन इतर सर्वकाही ) पंजाबी म्हणा, चायनीज, मेक्सीकन, इंटरकॉंटीनेंटल, नवे नवे खाद्यपदार्थ आपल्या ग्राहकांना देण्यास सुरवात केली. अगदी त्यात परत " जैंन " व्हर्जन वेगळॆ.

हे सारे करतांना त्यांचा मुळ बाज, आत्मा केव्हाच हरवुन गेला. पण आता एक वर्तुळ पुर्ण झाले आहे. बॅक टु स्वेयर वन.

"इडली हाऊस" मधे फक्त, हो केवळ इडली व तीचे नानाविध प्रकार या आपल्या उपहारगृहात, इडलीप्रेमिकांसांठी, भक्तांसाठी मिळतात.

पंधरा दिवसापुर्वी मी माझा नेहमीचा नियम ,शिरस्ता मोडला. प्रत्येक भेटीत बरेच प्रकार चाखायचे, त्यांचा आस्वाद घ्यायचा हा नियम. पण नेमके त्या दिवशी मला म्हैसुर रवा इडली येवढी आवडली की मी ती खातच सुटलो. मग त्या पुढल्या रविवारी जरासे अपराधी वाटायला लागले.

मग सुरवात केली कांचीपुरम इडलीने. त्यानंतर वाटले आता खोट्टॊ इडली खावी. फणसाच्या पानात लपटलेली ही इडली खाताखाता मुढो इडली खाण्याची तिव्र इच्छा होवु लागली.

केवडयाचा सुगंध आपल्याला नेहमीच मोहवत असतो, मग त्याचा पानात लपेटुन शिजवलेली , केवडयाचा धुंध सुवास लेवुन समोर आलेल्या या इडलीचा रसस्वाद घेतांनाही आपण तसेच बेबंध होत जातो.

आज बकासुराला लाजवायचेच असे मनोमनी ठरवलेले , मग तांदुळ आणि नारळ यांच्या संगतीत खुलुन निघालेली उंडी इंडली आणि त्या नंतर काकडीच्या रसात नटलेली , स्वाद घेवुन बहरलेली काकडी इडली खाण्याचा मोह काहीसा अनावर झाला.

गोड गोड गोड, या गोडावर काहीसा उतारा हवाच . काय खावु, आता काय बरे खावु, हां आत्ता आठवले, पेपर इडली, काळीमीरीचा तिखटसा झणका घेतलेली इडली खावुन मग

"अन्नदाता सुखी भव !"

या साऱ्या इडलींच्या रुबाब, तोरा वाढवावा, लज्जतीत न्यारी भर पडावी म्हणोनी संगतीस मनमुराद मिळाणाऱ्या सांबार, नारळाच्या चटणी बरोबर मोल्गापुडी, लिंबडापुडी तीळाच्या, नारळाच्या तेलाबरोबर दिली जाते.

टिप. येथे अरसिकांसाठी साधी नेहमीची इडली देखील मिळते.


No comments: