Wednesday, December 29, 2021

गोविंदा रेस्टॉरंट, इस्कॉन, जुहु

खरं म्हणजे केलेल्या, ठरवलेल्या ह्या संकल्पाची, निश्चयाची सुरवात एक तारखेपासुन व्ह्यायला हवी होती पण धीर धरवेल तर ते राजाभाऊ कसले ? मनात विचार आला की थांबु नये लगेचच त्याची अंमलबजावणी करायला हवी ह्या विचाराचे ते. मनुष्याने कसे मोहास शरण जावे.

दुनियेमधे असंख्य नविन नविन चांगली रेस्टॉरंट्स आली असतांना आपण मात्र अजुनही त्याच त्याच उपहारगृहामधे अडकुन पडलो आहे हे काही योग्य नव्हे. राजाभाऊंनी आपल्या मनाला सांगितले. आता ह्या येणाऱ्या नव्या वर्षात आपण फक्त आणि फक्त नविन जागीच जेवायला/खायला जायचे असा त्यांनी निश्चय केला. केला खरा पण काय करणार हे शेवटचे तीन-चार दिवस त्यांच्याने थांबवेना मग  उद्याला कुठे जेवायला जायचे काय जेवायचे ह्याचा विचार करता ते आदल्या रात्री मनाने पोचले "ओये काका" ह्या अमृतसरी जेवण मिळणाऱ्या रेस्टॉरंट मधे "सरसु का साग व मक्का दी रोटी" खाण्यासाठी.

पण नियतीस म्हणा किंवा भगवान श्रीकृष्णास म्हणा त्यांचा विचार पटला नसावा. त्यांना जुहु येथल्या "इस्कॉन" मधल्या "गोविंदा" मधे शुध्द आणि सात्विक जेवण जेवणासाठी बुलावा आला. 

भगवंतांना या रेस्टोरंटमधे तयार झालेल्या जेवणाचा प्रसाद चढवला जातो. प्रसादाचे जेवण. कांदा लसुण व्यर्जित पण तेवढेच चविष्ट. येथे बुफे मिळतो. बुफे मधे सुप,फळांचा रस, ताक, थंडाई, भरपुर सॅलर्ड्स, फरसाण होते. चार भाज्या. आलु गोबी, पनीर पालक, छोले आणि एक कसलीतरी. पोळ्या, पुऱ्या, पराठे, नान. भाताचे ही तीन प्रकार होते. साधा भात, डाळ, कढी, हैद्राबादी बिर्याणी, पनीर पुलाव आणि रायता.

बोक्याचे लक्ष कसे शिंकाळ्याकडे असते तसे राजाभाऊंचे लक्ष डेजर्ट्स कडे होते. जेवतांना ते जरा हात राखुन जेवले कारण गरमा गरम गुलाब जामुन, हे भले मोठाले, गाजर हलवा, रोशोगुल्ला, व्हॅनीला आईसक्रिम सोबत व बासुंदी जी खायची होती.

मन आणि पोट दोन्ही खुश झाले. अप्रतिम चविचे जेवण, बसण्याची उत्तम व्यवस्था, सुंदर अंतर्गत सजावत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अतिशय नम्र असणारा कर्मचारीवृंद. परत जायला हरकत नाही. समस्या एकच घरापासुन खुप दुर आहे.

























No comments: