Monday, December 20, 2021

लोकप्रभा

 मुंबई. अनेक रंगांची, अनेक ढंगाची. ह्या शहराची खाद्यसंकृती ही तशीच न्यारी. मुंबईमधे फिरत असतांना, भटकत असतांना मग अनेकदा प्रश्न पडतो की कुठे जेवायचे, कुठे खायचे ,काय जेवायचे.  मग मुंबईचे कोणते रुप पहायचे आहे ह्यावर ते ठरु लागते. 

१. देवाची मुंबई

२.सहलीची मुंबई

३.मुंबईकरांची मुंबई

४.खरेदीमुंबई

५.बहुसांस्कृतिक मुंबई

मुम्बाआई. मुंबईची आराध्यदेवता, मुळनिवासी असलेल्या कोळ्यांची कुलदेवता. मुंबई दर्शनाची सुरवात मुंबादेबीच्या दर्शनाने व्हावी. भल्या सकाळी मुंबादेवीचे दर्शन झाले आणि लगतच्या मुंबादेवी जिलेबीवाल्याकडची गरमागरम जिलेबी आणि पापडी खाल्ली की मग कसे मन प्रसन्न होवुन जाते. अजुन भुक असेल तर मग नास्ता करायला भुलेश्वरच्या नाक्यावरचे "सुरती" आहेच.

मुंबादेवी, भुलेश्वर, माधवबाग, पांजरपोळ, काळबादेवी, क्रॉफर्ड मार्केट, मंगलदास मार्केट. हा सारा परीसर म्हणजे देवदर्शन करणाऱ्यांसाठी,  खरेदी करु इच्छिणाऱ्यांसाठी जणु स्वर्गच.  मुंबादेवी, काळबादेवी, भुलेश्वराचे मंदिर . श्री लक्ष्मीनारायण मंदिर (माधवबागेमधले), श्री चंद्रप्रभ दिगम्बर जैन मंदिर, श्री सामुद्री माताजीका मंदिर, श्रीराम मंदिर, श्री लक्ष्मीनारायण मंदिर (भुलेश्वराच्या समोर) , श्री राधाकृष्ण प्रणामी मंदिर, नरनारायण मंदिर, श्री बालाजी रामजी मंदिर, रामवाडी राम मंदिर (क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय स्मारक ), श्री द्वारकाधीश मंदिर अशी असंख्य देवळे ह्या परीसरात आहेत. ह्या साऱ्या परीसरात फिरायचे म्हणजे दिवस पुरेसा पडायचा नाही. आता सारा दिवस देवदर्शन म्हणा, खरेदी म्हणा, कोणत्या ना कोणत्या निमित्त्याने फिरायचा ठरवला की मग बाहेर पोटपुजा करणे आलेच.  

मुंबादेवी मंदिराच्या बाजुलाच असलेले बी. ताराचंद भगत. डाळ फ्राय, त्यात तळुन घातलेला  कांदा. शेव टॉमेटोची भाजी, खस्ता रोटी (बटर मारके). मारवाडी पद्धतीचे देशी खुप चविष्ट जेवण येथे मिळते. ह्या परीसरात काळबादेवी मंदिराच्या समोर असलेले , अगदी साधचं असलेले, भपका अजिबात नसलेले पण रुचकर, चविष्ट अस्सल गुजराती जेवण जेवायचे असेल तर "फ्रेंडस युनियन जोशी क्लब ला पर्याय नाही. भुलेश्वर मधले वृंदावन भुवन उर्फ खिचडी सम्राट हा ही एक चांगला पर्याय आहे. डालबाटी, चुरमा लाडु, गरमागरम डाल ढोकली, जवळजवळ दहा प्रकारच्या मुगाच्या डाळीच्या खिचड्या.  मसाला खिचडी, हरीयाली खिचडी, ड्राय फ्रुट खिचडी , मकाई खिचडी काय मागवाल ते  खरे. मंगळदास मार्केट आणि क्रॉफर्ड मार्केट, लोहारचाळ. ह्या ठिकाणी आपले काहीच काम नसते, सोबतच्या महिला मंडळीची चाललेली खरेदी बघत रहाणे आणि आपले खाली खिसापाकीट सांभाळत रहाणे बस्स एवढेच. खरेदी करुन करुन दमल्यानंतर "बादशहा " मधे जाणे, खाणे आणि त्यांचा जगप्रसिद्ध फालुदा पिणे जर का झाले नाही तर ती खरेदी व्यर्थच म्हणायची.  

गिरगाव, ठाकुरद्वार, दक्षिण मुंबईचे हे जणु हृदयच.  अस्सल मराठमोळं खाणं मिळण्याची एक जागा. बालाजी मंदिर ज्या गल्लीत आहे त्या फणसवाडीच्या नाक्यावरचे "विनय हेल्थ होम ". साऱ्या मुंबईत सर्वोकृष्ट झणझणीत, तिखट, मिसळपाव, उसळपाव, पातळभाजी पाव कुठे मिळत असेल तर तो विनय कडॆच. आणि साबुदाणा वडा, त्याचे वरचे कुरकुरीत कोटींग,  सोबत ती मिळणारी चटणी, बटाटे आणि शेंगदाणे घातलेली त्याला तोड नाही.  लाजबाब. विनयचे वटाणा पॅटीस. बटाटावडा देखील मस्त असतो. ठाकुरद्वाराच्या नाक्यावर असलेले पुर्वाश्रमाचे बी.तांबे आणि आताचे सुजाता. नाव बदलेल पण त्यात मिळणाऱ्या मराठमोळं जेवण नाही बदलेले. मुंबईमधे महाराष्ट्रीय जेवण मिळणारी जी काही मोजकी ठिकाणं आहेत त्या मधले हे एक. 

गिरगावातील खोताची वाडी. एक हेरीट्ज साईट. १७५ वर्षे झालेल्या ह्या वाडीमधे, पुरातन घरं काही प्रमाणात का होईना पण टिकुन आहेत. ह्या वाडीमधे फिरुन गिरगावच्या बाजुला बाहेर आल्यावर  समोर येते ते "पणशीकर " . आपले मराठी खाद्यपदार्थ घेवुन. पण पणशीकरांकडे जाण्यापुर्वी समोरच्या "केशव विनायक " यांच्या दुकानात जरासे डोकावुन पहावे, कुठास ठावुक नेमक्या त्याच वेळी त्यांनी पुरणपोळ्या, तेलपोळ्या, बेसनाचे लाडु करायला घेतले असतील. ताज्या , गरमागरम पुरणापोळी, तेलपोळी खाण्यासारखे सुख नसावे.

पलिकडे प्रार्थना समाजकडे बाहेर पडल्यावर सिक्कानगरच्या समोरच फडकेवाडी गणेश मंदिर आहे. ह्या फडके मंदिरात जाण्यामागे आणखीन एक उद्दीष्ट असावे. समोरच्या "प्रकाश दुग्धमंदीर " मधे जावुन समाधान होईस्तोपर्यंत पियुष पिणे, मस्तपैकी वांगेपोहे घातलेली मिसळ, दही मिसळ, साबुदाणा वडे, साबुदाणा खिचडी खाणॆ. आपण ज्या दिवशी गिरगावात फिरत असतो त्या दिवशी नेमकी संकष्टी असणे हा एक उत्तम योग जुळुन येणे आहे. कारण एकच, प्रार्थना समाज जवळच्या माधवाश्रमात संकष्टीच्या रात्री मिळणारे अमर्यादीत भोजन, अमर्यादीत उकडीच्या मोदकासह. अमर्यादीत उकडीचे मोदक, स्वःत मालकांनी आग्रह करुन करुन खायला घातलेले उकडीचे मोदक. पोट तट्ट फुगुन ओसांडुन बाहेर वाहीपर्यंत  मोदक खावेत असा जणु नियमच आहे असे मनाशी बाळगावे आणि चविष्ट उकडीच्या मोदकांची मजा भरभरुन लुटावी.

दिवस दुसरा किंवा पहिलाही असु शकतो.

मुंबई दर्शन खास पर्यटकांसाठी. ज्याला ज्याची आवड असेल त्याप्रमाणॆ. मग ते छत्रपती शिवाजी टर्मिनस, फोर्ट, बॅलॅड पिअर भागात हेरीटेज वॉक  असो की गेटवे ऑफ इंडिया, नरीमन पॉईंट, चर्चगेट, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, बाबुलनाथाचे देऊळ, मलबार हिल, वाळकेश्वर , बाणगंगा तलाव, राणीचा बाग, महालक्ष्मीचे मंदीर आणि सिद्धीविनायक ही स्थळदर्शन असोत.

आता दिवसभर भ्रमंती करायची म्हटलं तर पोटातली टाकीपण तशीच फुल असायला लागते. मुंबईमधे आता  नाक्यानाक्यांवर असलेल्या इराण्यांकडचा बन मस्का, बृन मस्का व चहा आता खुप दुर्मिळ होत चालला आहे. अजुनही उत्तम चालणाऱ्या फोर्ट मधल्या "याझदानी बेकरी"  मधे मिळणाऱ्या बन मस्का, बृन मस्काची सर ना आधी दुसरीकडे कुठे होती ना भविष्यात असणार आहे.  छोलेकुलचे खाण्याची, अस्सल पंजाबी खाण्याची हुक्की आली असेल तर बाजुला असणारे "ओये काका " हा एक उत्तम पर्याय आहे. मात्र पंजाबी लस्सी प्यायची असेल तर येथे न पिता समोरच्या बाजुला असलेल्या "पंजाबी मोती हलवाई  " कडे प्यावी. अगदी लाजबाब लस्सी. ह्यांचे जेवणही छान असते. चविष्ट रस्सेदार पुरीभाजी खाण्यासाठी छत्रपती शिवाजी टर्मिनस समोरचे "पंचम पुरीवाला" मधे जावुन एक तर नुसती पुरीभाजी तरी खावी किंवा संपुर्ण जेवणाचे ताट तरी घ्यावे. बॅलॅड पिअर मधे फिरतांना जेवणाची वेळ झाली असेल तर मग मागचा पुढचा विचार न करता सरळ खुश्याल"ब्रिटानीया" मधे जावुन बेरी पुलाव खावा.  ह्या जेवणाच्या वेळॆत जर का चर्चगेट, नरीमन पॉईंट भागात असाल तर मग सम्राट किंवा स्टेटस मधली गुजराती थाळी किंवा पंजाबी पद्धतीचे जेवण आणि आणि हो " चर्चगेट जवळ असलेले "के. रुस्तुम" कडचे आईसक्रिम हे तर खायला हवेच. दोन बिस्किटांमधे ठेवलेली आईसक्रिमची एक स्लॅब खाल्यानंतर जिव्हा तृप्त झालीच पाहिजे. 

फिरता फिरता कधी संध्याकाळ होते ते कळतच नाही. संध्याकाळाची वेळ ही समुद्रकिनारी फिरण्याची उत्तम वेळ, नरीमन पॉईंट, मरीन व गिरगाव चौपाटी. आता मुंबईकरांचे फिरण्याचे हे आवडीचे ठिकाण असल्यामुळे तेथे अनेक तगडी उपहारगृह आहेतच. आता चौपाटी म्हटली कि पाणीपुरी, भेळपुरी, शेवपुरी, रगडापॅटीस हे आलेच. पण हे खातांना समोर जावुन "सुखसागर" मधे पावभाजी खायची आहे आणि बाजुला असलेल्या "ए वन कुल्फी " वाल्या कडची मलई कुल्फी, पिस्ता कुल्फी, विविध फळांच्या कुल्फी किंवा समोरच्या "बॅचलर्स"  मधे आईसक्रिम खायचे आहे हे भान राखलेले बरे. किंवा"ठक्कर्स"  मधली गुजराती थाळी किंवा क्रिम सेंटर मधे मिळणाऱ्या छोलेभतुरे ही आपली वाट बघत आहेत हे ही लक्षात ठेवावे.  बाबुलनाथच्या समोरच्या रस्त्यावर असलेल्या" गोविंदा" हे इस्कॉन टेंपल मधले रेस्टॉरंट. येथले शुद्ध आणि सात्विक ,कांदालसुण वर्जित असलेले पंजाबी पद्धतीचे प्रसादाचे जेवण ही फार छान असते.  पावभाजी हा प्रकार आणण्यामधे आणि लोकप्रिय करण्यामधे ताडदेवच्या "सरदार पावभाजी" चा मोलाचा वाटा आहे.  त्यांच्याकडची पावभाजी चुकवुन कसे चालेल ? ह्या भागात सकाळी नास्ता करायचा असेल तर एक अनोखा खाद्यपदार्थ मिळणारे उपहारगृह आहे. नानाचौकातले " हिन्दू विश्रांतीगृह " आणि मिळणारा तो खास पदार्थ म्हणजे " पोळामिसळ " आपण पोळा खाल्लेला असतो आणि मिसळ तर ती नेहमीच. पण जेव्हा कॉनफ्लेक्सचा चिवडा असलेले फरसाण असलेल्या मिसळीबरोबर तो पोळा खाल्ला जातो ना तेव्हा त्याची गोडी काही निरालीच असते. ही जोडी अगदी भन्नाट. 

मुंबईची मजा लुटायची असेल तर ती  रमतगमत पहावयाला हवी, त्या शहरामधली खाद्यसंकृतीचा आस्वाद चवीचवीने घ्यायला हवा आणि "आस्वाद जर का लुटायचाच असेल तर शिवाजी पार्क ला असलेल्या "आस्वाद" मधे न जावुन कसे चालले. त्यात परत "आस्वाद " मधल्या मिसळीला जगातील सर्वोकृष्ट शाकाहारी पदार्थ हा पुरस्कार परदेशात झालेल्या एका खाद्यस्पर्धेत मिळालेला. काळ्यावाटाण्याची उसळ, पोळा व त्या सोबत मिळणारे नारळाचे दुध, मसालेभात.  हे खायलाच हवे. पुढे जवळच सुप्रसिध्द "प्रकाश " आहे. प्रकाशचा साबुदाणा वडा, मिसळ, दही मिसळ, कुर्मापुरी, बटाटासुकी भाजी पुरी आणि वरती पियुष यांची  तारीफ करावी तेवढी थोडीच.

दाक्षिण्यात खाद्यपदार्थांची ज्यांना आवड असेल त्यांनी मुंबईत फिरतांना मुद्दामुन वाट वाकडी करुन माटुंग्याला जायला हरकत नाही. साऱ्या जगात जेवढे पारशी नसतील तेवढे मद्रासी लोक ह्या विभागात रहातात असे एक माटुंग्यालाच रहाणारा पारशीबाबा नेहमी बोलत असायचा.  मग ह्या सर्वांच्या पोटपाण्याची सोय करण्यासाठी ह्या भागात अनेक मद्रासी उपहारगृह आहेत. . रुईया महाविद्यालयाच्या " मणी " पासुन सुरवात झालेली ही खाद्यस्थळं आर्य भवन, राम आश्रय करत पार शंकर मठाजवळील "मणी "पर्यंत पोचलेली. माटुंगा रेल्वे स्थानकासमोरचे "राम आश्रय" तर या भागातले दादा उपहारगृह. केव्हाही जा खाण्यासाठी गर्दी ही असतेच असते. आपला नंबर लागण्यासाठी वाट बघितल्याचे सार्थक वातावरण निर्मीतीसाठी नमना आधी जरासे रसम पिवुन झाले की मग गरमागरम इडली, मेदुवडे, उपमा,  शिरा, पोंगल अवियल, कोकोनट शेवई, सादा डोसा, रवा डोसा, कांदा उत्त्तप्पा  व शेवटी  नीर डोसा व सोबतची नारळाची चोय, लाल चटणी, खावुन आणि वर  फिल्टर कापी पिवुन सांगता झाल्यावरच होते.  माटुंगा सर्कल मधले "कॅफे मद्रास " हे ही तसेच भारी उपहारगृह. शेजारचे "मद्रास कॅफे , आनंद भवन, अंबा भवन " कुठेही जावुन खावे. चॉईस अपना अपना. 

पण एक मात्र खरे ह्या विभागातली दोन स्थळं कधीच चुकवु नयेत, त्यातले पहिले म्हणजे माटुंगा रेल्वेस्थानका बाहेरच असलेले "रामानायक उडपी श्रीकृष्ण बोर्डींग" शुद्ध सात्विक भोजन. केळीचा पानावर मिळणारे अमर्यादीत फोर कोर्स जेवण, रसमभात, सांबारभात, वरणभात आणि दहीभात.  मर्यादीत जेवण जेवायचे असेल तर ते मात्र थाळी मधेच जेवावे लागते.आणि दुसरे म्हणजे किंग्स सर्कल, महेश्वरी उद्यानाच्या जवळमधले "इडली हाऊस " येथे मिळणाऱ्या विविध इडल्या पाहुन  काय खावु काय नाही असे होते. खोट्टॊ इडली, केवड्याच्या पानात गुंडाळलेली इडली, मुधो इडली, पेपर इडली, कांचीपुरम इडली , काकडी इडली मग तांदुळ आणि नारळ यांच्या संगतीत खुलुन निघालेली उंडी इंडली, काळीमिरी घाततेली इडली आणि त्या नंतर काकडीच्या रसात नटलेली , स्वाद घेवुन बहरलेली काकडी इडली आणि सांबार, नारळाच्या चटणी बरोबर मोल्गापुडी, लिंबडापुडी तीळाच्या, नारळाच्या तेलाबरोबर.

No comments: