Saturday, December 25, 2021

कॅफे मद्रास, राम आश्रय

 शेवटी निष्ठा ह्या महत्वाच्या. मग ते राजकारण असो, की समाजकारण की खाद्यकारण. 

ज्या ज्या काळात ज्यांना ज्यांना निष्ठा वाहीलेल्या असतात त्यांच्याशी त्या त्या काळात बांधीलकी रहाणॆ हे शेवटी महत्वाचे.


सुरवातीच्या काळात राजाभाऊंच्या निष्ठा ह्या "कॅफे मद्रास" ला वाहिलेल्या. मग हळुहळु "राम आश्रय" चा उदय व्हायला लागला, राजाभाऊंनी आपल्या निष्ठा अगदी सहजपणॆ त्यांच्याकडे वळवल्या. माटुंगा म्हणजे "राम आश्रय " आणि "राम आश्रय" म्हणजे माटुंगा असे जणु समिकरण मग तयार झाले.


आज माटुंग्याला गेलो असतांना राजाभाऊंना आपले पुर्वीचे दिवस आठवले, आणि मग आता बदल घडवुन आणायला हवा असे वाटायला लागले, बार बार लगातार तेच आणि तेच कशाला करत मग त्यांची पाऊले आपसुक "कॅफे मद्रास" कडे वळली.


आपसुक वळलेल्या पावलांना जाणिवपुर्वक आवर घातला असता तर बरं झाले असते असे म्हणायची आज पाळी आली.


"कॅफे मद्रास" 


पोटात प्रज्वलीत झालेल्या अग्नीत आधी आहुती म्हणुन रसम काय ओतले आणि तो अधिकच भडकुन उठला. त्या अग्नीला शमवायला सुरवातीस

मसाला नीर डोसा. येथल्या ह्या नीर डोश्यापेक्षा "राम आश्रय " चा नीर डोसा किती तरी अधिक सरस असतो. राजाभाऊंनी त्यांच्या मनाला सांगितले.

मग रवा डोसा. येथल्या ह्या रवा  डोश्यापेक्षा "राम आश्रय " चा रवा डोसा किती तरी सरस असतो. राजाभाऊंनी त्यांच्या मनाला परत सांगितले.


त्यात परत सांबारनी खुप निराशा केली. डोसा साधा त्याच्यात बुडवुन खावासा नाही वाटला मग चार-पाच वाट्या चमच्याचमच्याने ते पिणे दुरच.

दही वडा. दहीवडा कसला. तो तर बुंदीरायता वडा. खारी बुंदी. कधाचीत मद्रासमधे असा दहीवडा असावा, कुणास ठावुक ?


पण "कॅफे मद्रास" नाही जमले हे मात्र खरे. येथे पुर्वी सारखी पदार्थांची चव आता नाही राहिली असे राजाभाऊंचे वैयक्तिक मत जे पुर्वी झाले होते त्यावर आज शिक्कामोर्तब झाले. जेथे जेथे खाण्यासाठी फार फार गर्दी होत असते त्या त्या पासुन आता लांबच रहायला हवे, कारण जे काही बनवले जाते ते त्या गर्दीसाठी.


(हे राजाभाऊंचे वैयक्तिक मत आहे, आवड ज्याची त्याची )


No comments: