Tuesday, August 09, 2022

एक सफर सराफाची, इंदौर ची. बचेंगे तो और भी खायंगे.

एक सफर सराफाची, इंदौर ची. बचेंगे तो और भी खायंगे.

ओ बॉगवाले भय्या, जन्माला यावे, मस्तपैकी मनसोक्त्त खावे, पण चवीचवीने, आस्वाद घेत, तबीयतनी, मग सराफात न जावुन कसे चालेल? इंदौरला यावे, रात्रीअपरात्री राजवाडयाजवळील सराफ्यात फेरफटका मारावा व तब्बेतीने एकसोएक बढीया पदार्थ खावे, वर मस्तपैकी रबडी, मालपुवे, खावुन शीकंजी रिचवावी, आयुष्य सार्थकी लागले म्हणायचे. वैशिष्ट म्हणजे खाण्याचा प्रत्येक पदार्थ सजधजके आपल्या पुढे नजाकतीने पेश केला जातो, त्यानेच मन कसे प्रसन्न होते.

इंदौरला छप्पन बझार तसा आमच्या घराजवळ. सर्वप्रथम विजय चाट हाउस मधे गरमागरम खोबरा कचौरी, पॅटिस, ते पण लाजबाब तिखटमिखट, गोड, चटण्यात डुंबलेले, हाणावे. वरती बटाट्याचे आवरण, आत मधे खुसखुशीत खोबऱ्याचे सारण, चोय. मग दोन पावले जरा चाललो की "मधुरम" हे सुप्रसिद्ध मिठाईचे दुकान लागते, तेथे मधे गुलकंद भरलेली काजुकतरी मिळते तीचा आस्वाद घ्यावा, जवळील ओम के नमकीन मधे जावे, नमकीन चे शेकडो प्रकार बघुन पागल व्हावे, नमकीन हाणत घरी परतावे हा एक दिनक्रम. मग कधीतरी उपवासाच्या दिवशी कोठारी मार्केट समोर फरीयाली साबुदाणा खिचडी खायला जावी. आपण खातो ती साबुदाणा खिचडी एकदम सपक. रसहीन. रंगहीन. खिचडीवर साध्या, तिखट बटाटा वेफर्सचा, सळी, जाळी वेफर्सचा चुरा पेरावा, लालचुटुक डाळीबाचे दाणे, तिखटमाखट शेंगदाणे पेरावेत, रंगांची उधळाण जराशी वाढावी म्हणुन बारीक चीरलेली कोथींबीर पेरावी, मग मसाला भुरभरावा, खावी पण वेफर्सच्या साहाय्याने. मग समोरील स्टॉलवर फ्रुटचाट खावा, ब्रम्हानंदी टाळी.

पण ही म्हणजे एक रंगीत तालीम. सराफ्याची चव घेण्याआधीची. सावधान. सराफात प्रवेश करताना काळजी घ्यावी. सकाळी आहार माफक असावा, पोट पुरते रिकामे असावे, मुखवास, पाचकचुर्ण, हिंगगोली, जीरागोळी, आल्याचा रस, वेळप्रसंगी जेलुसील वगैरे तयार असावे, अती खाण्याने त्रास होवु शकतो, पण तो वेळोप्रसंगी सहन करण्याची तयारी ठेवावी, सकाळी बायकोला घेवुन सराफा मधे गेलो कि दागदागिन्याच्या मोहापायी खुप खर्च होण्याची शक्यता असते.

रात्री सराफातील सोन्याची दुकाने बंद झाली की मग त्याचे रुप पालटू लागते. हलवाई आपले थाळे घेवुन रस्तावर प्रगट होवु लागतात. जातीच्या खव्वयांची वर्दळ वाढू लागते, रात्र उत्तरोत्तर रंगु लागते. थाळ्यांवर, कलथे आपटल्यावर त्यातुन निर्माण होणारा मधुर नाद कानी पडाता, भुक प्रज्वलीत होवु लागते.

सराफाची प्रवेशाची सुरवातच मोठी लज्जतदार असत, दोन्ही अंगाला खुप चांगली दुकाने आहेत. उजवीकडील विजय चाट हाउस मधे प्रथम गरमागरम खोबरा पॅटीस, कचौरी (चटणी मारके) खावेत, पॅटीसची चव चटणीमुळे वाढते की चटणीची चव कचौरी मुळे, या वादात जास्त लक्ष न घालता, बाजुलाच फळांचे रस व आईस्क्रीम चे दुकान आहे, त्यात तहान भागवण्यापुरते रस पियावा, डाव्या बाजुला मग गरमागरम भल्यामोठाल्या कढईतील गुलाबजामुन मोहवीत असतात. पण ते जास्त हादडुन चालण्यासारखे नसते, कोणा लेकाला पहिल्याच फेरीत गारद होण्याची इच्छा असते? वरती परत मालपुवे ने नॉक आऊट होवुन सुद्ध्या चालणार नसते. बचेंगे तो और भी खायंगे.

मग आत शिरले की डाव्या हाताला लागते ते दुकान ज्यात, जगप्रसिद्ध, सुविख्यात " जोशी के दहिबडे " मिळतात, काठोकाठ दह्याने भरलेला द्रोण त्यातले ते वडे, हा द्रोण भरताभरता दुकानदार हवेत उंच कसा उडवतो ते न्हाहाळत मटवावेत. होशीयार , खबरदार, अजुन तळलेले गराडु, वर लिंबु पिळुन, मसाला भीरभीरुन, सादर केलेले चाखायचे आहेत. जर "भुट्टे का कीस" नजर अंदाज झालाच तर या चुकीस क्षमा नाही. आपल्याला रताळाचा कीस, बटाट्याचा कीस खाल्यामुळे माहीती आहे, पण मक्याच्या दाण्याचा हा आपल्या पुढे नजाकतीने, आब राखुन, थाटात पेश केलेला हा भुट्टे का कीस , आपणच संस्थानीक असल्याचे जाणवुन देतो.

आता गोड जास्त झाल्यावर या वर उतारा म्हणुन मग तिखटाला छोलेपॅटिस, आलु तिक्कीया बरे शोभतात. मग गव्हर्नरची गाडी साठी रस्ता मोकळा करायलाच हवा, अरे जिलेबीवाले भय्या, एक किलो जिलेबी खिलाईये. मग आपल्या समोर हलवाईजी जिलेबी करायला घेणार. आपल्या कडॆ मिळतात तश्या लहान लहान आकाराच्या नव्हे तर एकच भली मोठी. जी खायला काळीज ही सिंहाचे लागते. आपल्या कडच्या चार-पाच जिलेबी जरी खाल्या ना तर त्या केवळ दातामधल्या कॅवेटीतच जातात, पोटात जाणे दुरच. वर एक ग्लास गरमागरम दुध, तबियत खुश झाली पाहिजे.

हे सारे खावुन झाले की अखेर भैरवी, शिकंजी किंवा रबडी शिवाय सुटका नाही.

हे सारे पचायला मदत हवीच. मुखवास, जीरागोळ्या चघळत तबीयतशीर घरी परतावे.

मग कधीतरी रात्री काचमंदीर समोरील उपहारगृहात जावे. किंवा सराफामधील राजहंसमधे, तेथे डालबाफले मिळतात ते भरपुर किलोकिलोनी तुप घालुन खावे.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठावे ते केवळ राजवाडयाजवळ पोहे खाण्यासाठी व पलाशिया तील अगरवाल या मिठाईच्या दुकानात किंवा छावणी मधील मथुरावाला मधे मिठाई खाण्यासाठीच.

मन तॄप्त, चीत्ती समाधान.




No comments: