Tuesday, November 08, 2022

अंबा भवन / राम आश्रय

 सेलब्रेशन करायला काय राजाभाऊंना काहीही कारण पुरते.

आज संध्याकाळी उत्सव साजरा करायला राजाभाऊ सपत्नीक पोचले माटुंग्याला. 

काल  "अंबा भवन" बद्दल धोंडोपंतांनी लिहिलेले वाचल्यानंतर राजाभाऊंना कधी तेथे पोचतो असे झाले होते. खरं तर न्याहारी करायलाच जायचे होते पण आज सकाळी सात वाजल्यापासुन ते खुप बिझी असल्यामुळे "अंबा भवन " कडे संध्याकाळी पोचले. ही त्यांची ह्या ठिकाणी जाण्याची पहिलीच वेळ.

दुर्दैव राजाभाऊंची, तेथे पोचण्याची एवढी धडपड केली पण भवन त्यांच्यापासुन लांबच राहिले. खुप गर्दी, गाडी उभी करायला पण जागा मिळाली नाही.  होता है कभी कभी ऐसाभी होता है ।

मग काय ते पोचले आपल्या नेहमीच्या ठिकाणी  म्हणजे  "राम आश्रय " मधे पोचले. आज तेथे मन नाही रमले. 

पातळी काय फक्त प्रचाराचीच घसरते होय . खाण्याची नाही घसरत  काय ?

नीर डोसा आणि कोकोनट सेवया काही तितकेसे चविष्ट नव्हते.  रसम अगदीच बंडल. ( हे राजाभाऊंचे वैयक्तिक मत आहे ) 

कुठेतरी लांब गाडी उभी करुन "अंबा भवन " मधे जायला पाहिजे होते





मनाली

 हे रेस्टॉरंट काही वर्षापुर्वी बंद झाले आहे.

राहिल्या फक्त आठवणी.


"मनालीला नाही तर नाही , निदान मनालीत तरी"

काही माणसं असी असतात की त्यांना आपण कधी भेटलेले नसतो, ओळखत देखील नसतो पण का कोण जाणॆ त्यांच्या बद्दल आपल्या मनात कोठेतरी आदर असतो, आपुलकी असते, ममत्व असते 

हिमाचल प्रदेशातील मनाली येथे हॉटॆल व्यवसाय करणारे श्री. मकरंद कुलकर्णी. त्यांच्या बद्दल ऐकुन होते , कधी तरी वाचनात ही ते येत होते, एक मराठी माणुस आपल्या मुलखापासुन दुर वर हा व्यवसाय करतो म्हटल्यावर कौतुकही होते. दोन तीन वेळा मनालीला जाण्यापुर्वी त्यांच्याशी दुरध्वनी वरुन बोलणॆहे झालेले होते , पण जाणॆ रहित झाल्याने गाठभेट पडली नव्हती.

पुण्यामधे त्यांनी मेहंदळे गॅरेज जवळ रेस्टॉरंट सुरु केल्याचे वर्तमानपत्रात वाचल्यापासुन राजाभाऊची चुळबुळ सुरु झाली होती. तेथे जावुन जेवल्याशिवाय त्यांची जिव्हा व पोट शांत होणार नव्हते  

आज संध्याकाळचा बेत ठरवला होता, सौ. सानीया पाटणकरांचे गाणॆ व मनालीत जेवण. 

पण धीर धरवेना, राजाभाऊ सपत्नीक दुपारीच मनालीला पोचले , दम आलु काश्मीरी, पनीर रसभरे, पुलाव खाण्यासाठी.

चांगली प्रशस्त जागा, चवदार, रुचकर अन्न, जसे हवे होते तसेच.

चोखंदळ पुणेकरांनी मनालीला भर भरुन दाद दिली आहे. भर दुपारी देखील मनाली नुसते तुडुंब भरले होते. दाक्षिण्यात  पदार्थ, पंजाबी, चायनीस खाण्यासाठी येथे खवय्ये गर्दी करुन जमले होते. 

अगदी ऐसपैस जाग असलेल्या मनालीने सुरु झाल्यापासुन अगदी मोजक्या दिवसात रसिकांचे मन आणि पोट काबीज केलेले दिसतेय. 

मजा आली. फार आवडले. 

तर आता बार बार लगातार. मनालीत.





Monday, November 07, 2022

ओ पुणे

 पुण्याला पोहोचल्यावर राजाभाऊंनी फेसबुक उघडले आणि "पुणे ईट आऊट " नामक ग्रुप उघडला. रिचर्स करण्यासाठी. पुण्यात जवळपास काय नविन रेस्टॉरंट आली आहेत का ते शोधण्यासाठी. 


त्यात त्यांना ’नर्हे" मधले "ओ पुणे" हे रेस्टॉरंट सापडले.  त्याचा रिव्हु उत्तम होता. मग काय राजाभाऊंच्याने रहावते काय ? 


दुसऱ्याच दिवशी रात्री ते " ओ पुणे" येथे पोचले जेवण्यासाठी. प्रशस्त जागा, उत्तम अंतर्गत सजावट पहाता मन प्रसन्न झाले.


स्टार्टर्स मधे "पनीर रोझाली कबाब" मागवले. समोर आली उत्तम सजवलेली डीश. पहाताच दिल खुष झाले. पनीर रोलमधे चीज टाकुन केलेली तंदुरी डीश. चव मस्त होती. आवडली. पण झाले काय की त्यानीच पोट भरले. मग काय पुढे काहीच मागवले गेले नाही. आणखी एक गोष्ट. पनीर जरासे तिखट वाटत होते. कदाचीत काळेकाका व काळेकाकुंना तिखट खाण्याची सवय नसल्यामुळे असेल.









ऑरेंज ॲंड कं.

 सकाळचा वचपा अखेरीस राजाभाऊंनी रात्री काढलाच. साधे जेवायला पाहिजे काय?


पहिला घास. पहिली प्रतिक्रिया. "मस्त आहे". काळेकाकुंची.


"ऑरेंज ॲंड कं." 


सिंहगड रोडवर आता असंख्य उपहारगृह झाली आहेत पण फाईन डायनींग रेस्टॉरंटची उणीव भासत होती. ती ह्या "ऑरेज ॲंड कं" नी पुरी केली. अखेरीस राजाभाऊंनी सिंहगड रोडवरती जेवायला जायला उत्तम, सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ अशी जागा शोधली तर.


टॉमेटो सुप आणि पनीर बटर . बरोबर खस्ता रोटी आणि बटर कुलचा.


पण येथे एके गोष्ट खटकली. मेन कोर्समधे शाकाहारी खाद्यपदार्थ निवडण्यास जास्त वाव नाही. पनीरच्या डिशीसचाच भर आहे.  हे रेस्टॉंरंट नुकतेच उघडले आहे. मेन्युत बदल घडवतील अशी आशा आहे.












माणिकलाल सॅनीटेरीयम

 आता वादविवाद हे काय होत रहातात, त्यात सरसी कोणाची होणार हे ही ठरलेलेच असते.



गेल्याच आठवड्यातील गोष्ट. पुण्याच्या वाटेवर राजाभाऊंनी "सयाजी" मधे बुफे जेवायला जायचे होते तर काळेकाकुना साधे, रुचकर, घरगुती गुजराती जेवायला लोणावळ्याजवळच्या नांगरगाव मधल्या "माणिकलाल सॅनीटेरीयम" मधे जायचे होते. काय ते नेहमीच "सयाजी" मधे जेवायला जायचे ? काळेकाकांचेही तेच मत होते. काय ते नेहमीच "माणिकलाल" मधे जेवायला जायचे.


विचाराअंती "माणिकलाल" मधे जेवायला जायचे हे ठरले.


"घुगरा" खाल्यावर मन एकदम प्रसन्न झाले. उत्तम चवीचा होता.


पुरणपोळी, बटाट्याची भाजी, पापडीची भाजी, चण्याची भाजी, गोडुसी डाळ, भात.


मन आणि खिसाही खुष झाले


















Monday, October 31, 2022

कल्पना

 कल्पना

ड्रिमलॅंड चित्रपटगृहाच्या समोरचे. शेट्टीचे उपहारगृह, इडली, डोसा आणि तत्सम खाद्यपदार्थ मिळण्याचे.

लहानपणी वडीलांबरोबर मार्केटात जाताना हे रस्तावर असल्यामुळे कधीतरी रविवारी जायला व्हायचे.

उपमापोहा मिक्स अजुनही आठवतो आहे.

हे बंद झाले आणि आता त्याची जागा बार नी घेतली आहे.

भारत ज्योती, कामत

 एवढ्या मोठ्या महानगरात, एका अश्या शहरात जे चोवीस तास बाहेर रस्तावरच असते , एवढ्या मोठ्या संख्येने उपहारगृह/ भोजनगृह अशी कशी बंद पडतात हे समजण्यासाठी जरा मुश्किल होवुन जाते.

नानाचौकातुन ग्रॅंटरोड रेल्वेस्थानकाकडे जातांना उजव्या बाजुला "भारत ज्योती " मधे उसळपाव, पोळाउसळ खाल्लाचे आठवते. छोटीशीच जागा होती. 

डाव्या बाजुला एक आइसक्रीम पार्लर होते. बऱ्यापैकी मोठी जागा,  वाईन पिण्यासाठी असलेल्या मोठ्या गोल ग्लासाप्रमाणे असलेल्या ग्लासात आइसक्रीम, जेली मिळायची. अनेक प्रकारची सरबतं सुद्धा असायची, ग्लासांची, सरबतांच्या बाटल्यांच्या शोकेस मधे केलेली मांडणी अजुन आठवते.

जरा पुढे गेले की भाटीया रुग्णालयाच्या समोर "कामत" होते. किती वर्षे बंद पडल्याला झाली असतील , पण नावाचा बोर्ड अजुन जागच्या जागी आहे.

राजाभाऊंच्या वाट्याला चारचार गुलाबजामुन

 राजाभाऊंच्या वाट्याला चारचार गुलाबजामुन




मेला.

 मेला.

पुनम चेंबर्स कडुन वरळीनाक्याला जो रस्ता वळतो तेथेच कोपऱ्यावर हे "मेला " होते. 

अगदी नावाला साजेशे. 

एक धम्माल जागा. नुसतेच जेवण जेवायचे नाही तर जत्रेची मजा लुटत त्याचा आस्वाद घ्यायची. 

ही थीम असलेले मुंबईमधले बहुदा हे पहिलेच रेस्टॉरंट. 

ज्योतिष्यी, पोपटवाले, मेंदी काढणाऱ्या, समोर बांगड्‍या बनवुन हातात घालायला देणाऱ्या, जत्रेमधे जसे वातावरण असते अगदी तसेच. जेवणही टेस्टी असायचे 

का कोण जाणे पण बंद पडले. नंतर त्यांनी या जागेचा, ह्याच माहोलमधे पार्ट्या देण्यासाठी उपयोग करायका सुरु केले. तेव्हाही राजाभाऊ तेथे ऑफीस मधुन गेले होते.

मग ते ही बंद झाले.

व्हिवा पश्चिम

 व्हिवा पश्चिम.. वरळी नाका. 

खाद्यक्षेत्रातील फार मोट्‍या व्यक्तींनी हे रेस्टॉरंट सुरु केले होते. गोवा , पश्चिम किनारपट्टी पासुन मग महाराष्ट्रातील अनेक प्रांतातले भोजन येथे मिळत असे. सीकेपी आदी मुळाच्या रहिवाश्यांची खाशीयत असलेले पदार्थ पण मिळत असत. नावाचा खुप दबदबा होता. ह्या बद्द्ल खुप चांगले लिहिलेले, तारीफ केलेले वाचायला मिळायचे. 

असेच भुलुन राजाभाऊ एकदा सकुटुंब सपरिवार येथे आपल्या पद्धतीचे अन्नग्रहण करण्यास गेले.

अत्यंत महागडे आहे हे ठावुक असतांना गेल्यानंतर वास्तविक पहाता बील देतांना मन खट्टु व्हायला नको होते. पण झाले खरे. 

आपली बायकोनी बनवलेल्या बटाट्‍याच्या, वांग्याच्या भाजीची चव ह्यांच्या चवीपेक्षा चांगली असते, हा पदार्थ  असा असतो ? आपले एक महिन्याचे रेशन या पैश्यात आले असते अश्या विचारांना खरं बघायला गेलं तर नंतर काहीच अर्थ नसतो.

पण निराशा झाली खरी. वाटली तशी जागा मोठी नव्हती, लहानशीच जागा, येथे म्हणे खुप चांगले कार्यक्रम होतात असे वाचले होते. कदाचित त्या दिवशी नसावेत. 

नंतर कधीतरी..

परत एकदा येथे जाणॆ झाले आजोबा आणि नातु. फक्‍त दोघेच. आजोबांकडुन नातवाला ट्रीट.

आपला मुलगा त्याच्या मुलाला जेवायला घेवुन ह्या ठिकाणी गेला होता म्हणुन आपण आपल्या नातवालाही तेथे आपण घेवुन गेलो ही माझी चुक झाली असे प्रांजळपणे राजाभाऊंच्या वडलांनी कबुल केले. 

केव्हाच बंद झाले.

आश्रय

 गिरगावातुन फिरतांना आज राजाभाऊंचे लक्ष अचानक एका उपहारगृहाकडे गेले.

शटर  डाऊन.

अनिष्ट शंका मनात येवुन त्यांनी समोरच्या दुकानात चौकशी केली. " हे शनिवारी बंद असते का ?"

उत्तर मिळाले.

"बंद होवुन दोन महिने झाले "

आश्रय. शुद्ध शाकाहारी.

इडली, डोसे, पावभाजी . पिझ्झा, सॅंडवीझ वगैरे मिळणारे उपहारगृह, जेथे राजाभाऊ कधीच गेले नाहीत. गेले नाहीत कारण त्यांचे जाणे नेहमी बाजुच्या "राजा " मधे व्हायचे.

सॉल्ट वॉटर ग्रील

 कसं छानसं रोमॅंटीक माहोल, साऱ्या वातावरणात भरुन उरलेले. 

चांदनी रात, समुद्रकिनारा, हवेत गारठा वाढलेला, लाटांचा आवाज.मंद प्रकाश देणारे दिवे. सभोवताली असलेला हाय फाय क्राऊड.

समोर आलेले खाणॆ ही तसेच जबरदस्त, भारदस्त. 

पण ह्या साऱ्या खुषीत एक कमी होती, एकीची उणीव भासत होती, काश वो भी होती. 

पण ते शक्यच नव्हते. एकावेळचा जेवणाला एक पगार. जाणॆ नसतचं जमले जर का तुम्हाला साहेबांनी आमंत्रण दिले नसते तर.

गिरगाव चौपाटी. लहान चौपाटी. मफतलालच्या बाजुला. 

सुनील शेट्टीनी तेथे रेस्टॉरंट सुरु केले होते.

"सॉल्ट वॉटर ग्रील " 

हे ही बंद पडले.

रताळ्याच्या गाड्या

 पहेला नशा, पहेला खुमार .

समजा ह्या मौसमात रस्त्यामधे एका हातात कागदाची पुडी व दुसऱ्या हाताने त्यातले जिन्नस तोंडात टाकता टाकता ब्रम्हानंदी टाळी लागलेला एखादा जाडजुड माणुस चालतांना दिसला तर खुशाल समजावे, हे कोण गृहस्थ ते.

यंदाच्याला ह्या भाजलेल्या रताळ्याच्या गाड्या लवकर उभ्या रहायला लागल्याहेत. 

एक मात्र खरे, अहमदाबादेत खाल्लेल्या "साकरीया" ची चव मुंबईमधे मिळणाऱ्या रताळ्याला नाही.





कॅफे विहार आणि श्री कृष्णा.

 कॅफे विहार आणि श्री कृष्णा.

खरचं , उदंड आश्रयदाते लाभले असुन सुद्धा  उपहारगृह बंद पडते तेव्हा खरोखरीच आश्चर्य वाटत रहाते.

ज्यांच्या घरी रविवारी संध्याकाळी चुल पेटत नाही अश्यांची येथे मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायची. इडली डोश्यापासुन पंजाबी पर्यंत सब कुछ मिळायचे. 

ऑपेरा हाऊस समोरचे कॅफे विहार बंद पडले. त्या जागी आलेले श्री कृष्णा काही काळ तुफान चालत होते , आता ते ही बंद. 

ओपन हाऊस

 "ओपन हाऊस " लिंकींग रोड, बांद्रा. 

उंचे लोग, उंची पसंद. एकदम पॉश रेस्टॉरंट. त्या काळात अश्या जागा म्हणाजे जरा नाविन्यच होते. 

असेच एकदा तो आणि ती येथे खायला गेले होते. बाजुच्या टेबलावर मुलगी पहाण्याचा कार्यक्रम सुरु होता. मुलगी, मुलगा, आईवडिल, काका ,मामा, आत्या, मावशी, आजी आजोबा सारे खानदान आले होते. मुलगी बघण्याच्या कार्यक्रम संपला, खायला माग माग मागवलेले निदान उष्टवले तरी असावे हा पडलेला प्रश्न. 

तो आणि ती नी दोघां मिळुन मागवलेले एक सॅंडवीझ. परबडण्यासारखे तेच होते.

बंद झाले.

इराण्यांची किती रेस्टॉंरंट बंद पडली ?

 इराण्यांची किती रेस्टॉंरंट बंद पडली हे आठवायला घेतले आहे. जागा आठवतात. नाव आठवतीलच असे नाही.

बोरीबंदरला सध्या जेथे मॅकडॉनल्स आहे त्या आधी तेथे.

मेट्रो समोरचे बस्तानी.

चर्नीरोड रेल्वे स्थानकासमोर, लाड मॅन्शनच्या बाजुला.

चर्नीरोड रेल्वे स्थानकासमोर, गिरगावात जाणाऱ्या रस्त्यावर. सध्या येथे " गोल्डन स्टार " आहे.

डॉ. दादासाहेब भडकमकर मार्गावरचे "गुडमन"

बाळाराम स्ट्रीटच्या नाक्यावर.

क्र.

प्रकाशकडुन आणलेले पार्सल

 रात्र झाली. कार्यालयातुन राजाभाऊ घरी आले. आल्या आल्या फेसबुकाला चिकटले.

काळेकाकुंनी त्यांना दिवसभराच्या घडामोडी सांगायला सुरवात केली.

काल बेसन भाजुन ठेवले होते.

हुं.

आज सकाळी बेसनाचे लाडु वळले.

हुं.

मग दुपारी चिवडा केला.

हुं.

संध्याकाळी चकल्या वळुन वळुन हात दुखावला

हुं.

आता उद्या शंकरपाळ्या करीन.

हुं.

आज मी जेवण केलेले नाही माहिती आहे ना.

हुं.

अरे, तुला येतांना प्रकाशकडुन खायला आणायला सांगितले होते. आणलेस का ?

हुं.

नसेल आणलेस तर सांग, आपण जेवायला बाहेर जावु.

हुं.

रागाचा जेव्हा भडका उडला तेव्हा कुठे राजाभाऊंच्या डोक्यात प्रकाश पडला.

आतापर्यंत आपण नुसताच " हुंकार " देत होतो.

मग त्यांनी आपली बॅग उघडली आणि प्रकाशकडुन आणलेले पार्सल बाहेर काढले.

कुलकर्णी उपहारगृह

 किंमत फक्‍त २५ पैसे. पंचवीस पैसे. एका डिशला.

गरमागरम बटाटा भजी. तोडाला पाणी सुटतील अशी. बेष्ट इन द वर्ल्ड 

बटाटा भाजी. काहीशी अलग चव. मस्त पैकी हिंगाचा स्वाद असलेले.

पण एकापेक्षा जास्त पदार्थ खाणे आर्थिकदृष्टा परवडणे  नाही.

"कुलकर्णी उपहारगृह."

प्रार्थना समाज. सन १९७० वगैरे.

राजा राममोहन रॉय यांचे प्रार्थनासमाज व कुलकर्णी उपहारगृह दोघेही कालोघात कुठेतरी गायब झाले

इडली हाऊस. माटुंगा.

 इडली हाऊस. माटुंगा. 


किती इडल्या खाऊ आणखी कोणत्या खाऊ असे होते.








Tuesday, October 25, 2022

नोवाटेल

 आज सकाळी राजाभाऊ पाली येथे बल्लाळेश्वराच्या दर्शनाला निघाले तेव्हा त्यांचा निश्चय ठरला होता.

आजचे भोजन जाभुळपाड्यामधल्या "दिक्षित भोजनालय" मधे.

गेल्या वेळी त्यांना ते आवडले होते. जायचे म्हणजे तेथेच जायचेच असा त्यांनी  आज ठरवलेले. 

पण हाय. नियतीला हे मंजुर नव्हते. कोणाच्या नशिबी कुठुनचे अन्न असेल हे सांगणे तसे कठीण. एक आश्चर्य त्यांच्यासाठी वाट बघत होते.

"नोवाटेल" ह्या खोपोलीमधल्या पंचतारांकीत हॉटेलमधे बुफे जेवायला जाण्याचा बेत अगोदरच त्यांच्या बरोबरच्यांनी ठरवला होता कारण त्यांच्यासाठी आज दिवस तसा खासच होता.

आणि त्यात बुफे म्हणजे राजाभाऊंचा जीव की प्राण. मग काय राजाभाऊंचा विचार बदलायला वेळ लागतो होय ?

मग काय ते ’नोवाटेल" मधे जेवायला गेले, हाण हाण हाणले आणि सुस्तावुन गाडीत झोपुन गेले.