Friday, May 27, 2022

ओये काके

 राजाभाऊंच्या पोटात कधी कोणते खाणे जाणे असेल ह्याची त्यांना पण कल्पना नसेल.

आज सकाळी बाहेर पडले तेव्हा त्यांच्या मनाशी ठाम निश्चय  झाला होता. काही हो होवो आज "उडपी "ला भोजन करायला जायचे म्हणजे जायचेच. 

पण हा विचार करतांना मनात कुठेतरी खोल तळात त्यांना ही ठावुक होते की हे शक्य नाही, कदापी शक्य नाही. आणि मग झालेच तसे. नेहमीप्रमाणे " मोडता " आड आलाचं. 

चल गं सखे वृदांवनी जावु, सात्विक आहार करु, इस्कॉन मधल्या "गोविंदा " मधे भोजन करावयासी.  रामा नाहीतर नाही निदान कृष्णाचे दर्शन तरी घेऊ.

"गोविंदा" मधे अपेक्षेप्रमाणेच तुफान गर्दी. गुर्जर भाई आणि भाभींची. नुसता कलकलाट, आरडाओरडा, गोंधळ आणि गोंधळ. ही माणसं कधी शांतपणे बसुन की बसुन शांतपणे जेवत नसतील काय ? त्यात परत टेबल मिळाले ते अगदी दरवाज्याकडचे. वय झाले, आता राजाभाऊंना आवाज सहन नाही होत.  तेथुन राजाभाऊ उठले आणि गुजरातला पोचले. गुजराती थाळी खाण्यासाठी "सम्राट" मधे. दरवाजाबाहेरील तोबा गर्दी. ही लोकं कधी घरी जेवण करतच नसतील काय ? एकीकडे भुक सहन होईनाशी झाल्यामुळॆ मराठी (आपले नावालाच) आमदारनिवासात पण जेवायला जायची तयारी , दुसरीकडे गुजराती भोजनाची पडलेली भुरळ. 

गाडी वळली डंकन रोडला "आदर्श महाल" च्या दिशेने. 

अचानक रस्त्यात फर्माईश आली. 

"चलो अमृतसर चलते है " . 

"वाहे गुरु की, यस मॅडम , आपल्या आज्ञाचे पालन केले जाईल, आपण आज्ञा करावी आणि ह्या सेवकानी ती पाळावी (नाहीतर पोट उडवले जाण्याची भीती.)"

"ओये काके " 

.

अमृतसरी शुद्ध शाकाहारी भोजन मिळण्याचे एक  उत्तम ठिकाण.  

हे जेव्हा नुकतेच सुरु जाहले होते तेव्हा तेथे राजाभाऊ सहपरीवार जेवायला गेलेले. तेव्हा खुप आवडले होते. पण त्या वेळेपासुन का कोण जाणे परत जाणे नव्हते जमले. आज हा योग जुळुनी यावयाचा होता 

नाहीतरी बरेच दिवस झाले "छोले कुलचे " खायचेच होते, ओय ठिक है, चलो आज वो भी खाके देखते है । पण झाले भलतेच. कुलचे मागवले कोणी आणि पोटात गेले कोणाच्या ? मग राजाभाऊंना काळेकाकुंनी मागवलेले कोफ्ते खायला लागले, जे काकुंना अगदी मनापासुन आवडले होते. कोफ्ते छानच होते. आणि त्यात परत आलुकुलचा सोबत छोले. 

क्या कहना. बढीया. दिल और पेट दोनो खुष हो गये. फतेह करुनच ते दोघे समाधानाने बाहेर पडले.

जेवण झाल्यावर वरती ग्लासभर लस्सी पिण्याचा विचार होता पण पिणे नाही झाले. 

मनाला शेवटी शेवटी का होईना राजाभाऊंनी आवर घातला.












No comments: